पुणे : मध्य भारतावर असलेला कमी दाबाचा पट्ट्याचा प्रभाव कमी होत आहे. तसेच सौराष्ट्र व कच्छच्या प्रदेशात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा ओमानकडे सरकत असून, त्यामुळे अरबी समुद्रावरून आर्द्रता खेचली जात आहे. तसेच बंगालच्या उपसागरावरून राज्यात येणारी आर्द्रताही कमी आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून येत्या पाच दिवसांत राज्यातील पाऊस कमी होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्यातील एकाही जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला नाही.
राज्यात गेल्या आठवडाभरापासून अनेक भागांत विशेषकरून कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाट परिसर, मराठवाडा व पूर्व विदर्भात अतिवृष्टी झाली. मात्र, येत्या पाच दिवसांत पावसात घट होणार असल्याचा अंदाज आहे. याबाबत हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी म्हणाले, ‘मध्य भारतावर असलेला कमी दाबाचा पट्टा कमी होत आहे. तसेच सौराष्ट्र व कच्छच्या प्रदेशात एक कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. हा पट्टा अरबी समुद्रातून आर्द्रता खेचून घेत आहे. त्यामुळे अरबी समुद्रातून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यांसोबत असलेली आर्द्रता कमी होत आहे. तसेच मान्सूनचा कमी दाबाचा पट्टाही दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकत आहे. त्यामुळे दक्षिणेकडील राज्यांतील पाऊस कमी होत आहे. तसेच राज्यातही तो कमी होत आहे. त्याचप्रमाणे बंगालच्या उपसागरावरील ओडिशा किनारपट्टीवरील कमी दाबाचे क्षेत्र स्थिर असले तरी त्याला अरबी समुद्रातून ओढून घेणारा पट्टा वर सरकला आहे. त्यामुळे कोकण व पूर्व विदर्भात सर्वदूर पाऊस राहील; पण त्याची तीव्रता कमी होत आहे; तर दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भात केवळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.’
पुणे शहरातही शुक्रवारी केवळ हलक्या पावसाने हजेरी लावली. अधूनमधून ऊनही पडले. सायंकाळी पुन्हा हलक्या सरींनी हजेरी लावली. पाऊस कमी झाल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. खडकवासला प्रकल्पाच्या धरण क्षेत्रांतही पाऊस कमी झाला असून शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत चारही धरणांत एकत्रित १६ टीएमसी अर्थात ५४.६९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. शहरात पुढील पाच दिवसांत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रात्री साडेआठपर्यंत झालेला पाऊस : शिवाजीनगर ४.६, लोहगाव ५.४ , मगरपट्टा ५.५, लवळे ८.५, चिंचवड १३.