Maharashtra Rain Update: गेल्या काही दिवसांपासून दडी मारुन बसलेल्या पावसाचं राज्यात उद्यापासून पुढील चार दिवस पुन्हा आगमन होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाचे क्षेत्र आणि त्याचा पश्चिम व मध्य भारत क्षेत्रातून प्रवासाच्या शक्यतेमुळे राज्यात येत्या ४ ते ५ दिवसांत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.
राज्यात ३० ऑगस्ट रोजी पावसाचा जोर वाढणार असून परभणी, नाशिक, ठाणे, रायगडसह कोकण पट्टा आणि पालघरसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर मराठवाड्यासह विदर्भातही पावसाच्या सरी बसरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.