मुंबई - संपूर्ण जून महिन्यात पुरेसा सक्रिय नसलेल्य मान्सूनने गेल्या दोन तीन दिवसांपासून चांगलाच जोर धरला आहे. कोकणापासून विदर्भापर्यंत सर्वदूर पावसाच्या जोरदार सरी कोसळत असून, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईतही अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पाणी साठले असून, वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान, पुढचे पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊत पडेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
राज्यातील पर्जन्यस्थितीबाबत माहिती देताना हवामान खात्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले की, आज मान्सून सक्रिय आहे. आपल्या सामान्य स्थितीच्या दक्षिणेला आहे. कोकण किनारपट्टीवर जोरदार वेस्टर्निस्ट आहे. कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेशच्या मध्यवर्ती भागावर आहे. त्याच्या प्रभावामुळे पुढचे ५ दिवस कोकण किनारपट्टीवर आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती डॉ. जयंता सरकार यांनी दिली आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. मागील २० तासांपासून पाऊस सुरू आहे. युद्धपातळीवर दरड बाजूला सारण्याचं काम सुरू आहे. याठिकाणची वाहतूक पर्यायी रस्त्याने वळवण्यात आली आहे. चिपळूण परिसरात अवजड वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचं दिसून येत आहे.
तर आज सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे हार्बर लाईन आणि मध्य रेल्वे मार्गावरील सर्व ट्रेन्स सुमारे ५ ते १० मिनिटे उशिराने धावत आहेत. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सुमारे १० मिनिटे उशिराने धावत आहे. ताज्या माहितीनुसार, सध्या लोकल सेवा अद्याप सुरू आहे ही दिलासा देणारी बाब आहे, पण हवामान विभागाने आजही दिवसभर मुंबईत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे दिवसभर पाऊस पडल्यास रेल्वे सेवा बंद होण्याचीही शक्यता आहे. आज ४ वाजता हाय टाईटची परिस्थिती आहे. त्यावेळी जर मुसळधार पाऊस बरसला तर कुर्ला, माटुंगा, सायन, ठाणे यांसारख्या स्टेशनवर ट्रॅकवर पाणी भरण्याची शक्यता आहे.