मुंबई : संपूर्ण जून महिन्यात मुंबई आणि परिसराकडे पाठ फिरवणाऱ्या पावसाने मंगळवारी महामुंबई परिसरात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. सोमवार रात्रीपासून पावसाने मुंबई उपनगरे आणि परिसराला झोडपून काढण्यास सुरुवात केली. मंगळवारी सकाळपासूनच पावसाने संततधार सुरू ठेवल्याने मुंबईतील सखल भागात पाणी साचले. त्यातच रेल्वे वाहतूकही कोलमडल्याने मुंबईकरांची दैना उडाली. महामुंबई परिसरात अनेक ठिकाणी पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाल्याने वाहतुकीचे तीनतेरा वाजले.
कुठे काय झाले?मंगळवारी दिवसभर धो-धो कोसळलेल्या पावसाने मुंबईची तुंबई करुन टाकली. दादर येथील हिंदमाता, माटुंगा येथील गांधी मार्केट, सांताक्रुझ येथील मिलन सब-वेसह कुर्ला, सायन आणि चेंबूर तुंबवून टाकले. तुंबलेल्या गुडघाभर पाण्यातून वाट काढताना मुंबईकरांची अक्षरश: तारांबळ उडाली. तर अनेक भागांत वाहतूक मुंगीच्या गतीने पुढे सरकत होती. गेल्या २४ तासांत मुंबईत १०० मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली.
रायगड जिल्ह्यात मुसळधाररायगड जिल्ह्यालाही मंगळवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. दरडग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. पोलादपूर तालुक्यातील १२ गावांतील १७० कुटुंबांतील सदस्यांना स्थलांतरित केले आहे. संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १४३.८० मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
कोकणात पूरस्थितीरायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा सर्वाधिक जोर होता. रत्नागिरी जिल्ह्यात लांजात सर्वाधिक पाऊस ३४२ मिलीमीटर पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून, वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक २४०.३ मिलीमीटर पाऊस झाला. रायगड जिल्ह्यच्या पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त व पूरग्रस्त गावातील १७० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीकोल्हापूर जिल्ह्यात गगनबावड्यासह चार तालुक्यांत अतिवृष्टी झाली असून, १९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. बहुतांशी नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले असून, ‘एनडीआरएफ’च्या दोन तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या. सांगली, सातारा जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे.
विदर्भात अमरावती, वर्धा, गोंदियात पूरविदर्भात अमरावती, वर्धा जिल्ह्यांतील आठ तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. आठवडी बाजारात हर्रासाकरिता आलेले ४२ व्यापारी व विक्रेते पुराच्या पाण्यात अडकल्याने त्यांना रेस्क्यू करीत सुखरूप बाहेर काढले. वर्धा, गोंदियात अतिवृष्टी झाली. अकोला, बुलडाणा आणि यवतमाळ जिल्ह्यातही दमदार पाऊस झाला.
पनवेल तालुक्यातील डुंगी गाव पाण्याखाली
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भरावामुळे पनवेल तालुक्यातील डुंगी गावात दीड ते दोन फूट पाणी साचले आहे, तर काहींच्या घरात पाणी गेल्याने मालमत्तेचे नुकसान झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून अशीच स्थिती असून विमानतळाचा भराव त्यासाठी कारणीभूत असल्याचे डुंगी ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाणी घरांमध्ये शिरले होते. त्याचा फटका नागरिकांना बसला. कित्येकांचे संसार उघड्यावर आले आहेत. डुंगीसह अनेक गावांतही पावसाचे पाणी शिरण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे भविष्यात काय परिस्थिती उद्भवेल, या भीतीने ग्रामस्थ चिंताग्रस्त असतात.
अतिवृष्टीचा इशारा६, ७, ८, ९ जुलै मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.६ ते ८ जुलै दरम्यान रायगड आणि रत्नागिरी, सिधुदुर्ग, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता आहे.६ ते ८ जुलै दरम्यान कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता आहे.याशिवाय वरील काळात घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.