मुंबई: गेल्या अनेक तासांपासून राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसतो आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. चिपळूणची अवस्था अतिशय विदारक आहे. गेल्या २४ तासांपासून अधिक काळ चिपळूण पुराच्या पाण्याखाली आहे. सध्या एनडीआरएफच्या पथकांकडून मदतकार्य सुरू आहे. काही जिल्ह्यांमध्ये दरडी कोसळून अनेकांचा जीव गेला आहे. रायगड, साताऱ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र संकटांची मालिका संपताना दिसत नाही.
रायगड, साताऱ्यातील प्रत्येकी दोन ठिकाणी दरडी कोसळल्या. या भागात बचावकार्य करताना पाऊस अडथळा आणत आहे. संपूर्ण चिपळूण पाण्याखाली गेल्यानं हजारोंचा जीव टांगणीला लागला आहे. या भागातील पाण्याचा निचरा न झाल्यानं अजूनही अनेक भागांत नागरिकांचे हाल सुरू आहेत. त्यातच पुढील काही तास राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. त्यामुळे अडचणी वाढणार आहेत.मोठी दुर्घटना! महाडमधील तळीये गावात दरड कोसळली, ३५ जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूरात पुढील काही तास मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. कोकणासह गोव्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गात २०० मिलीमीटर पाऊस होईल अस अंदाज आहे. त्यामुळे पुढील ३ ते ४ तास पूरग्रस्त भागासाठी महत्त्वाचे आहेत. या भागात मदत पोहोचवयाची असल्यास पावसानं थोडी उसंत घेणं गरजेचं आहे. मात्र सध्या तरी वरुणराजा थांबायचं नाव घेताना दिसत नाही. त्यामुळे पूरग्रस्त भागांसमोर दुहेरी संकट उभं ठाकलं आहे. औरंगाबाद, बीड, सोलापूर, ठाणे जिल्ह्यांतही अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.