मुंबई : राज्यात पावसाच्या जोरधारा कायम असून अनेक नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक धरणांचे दरवाजे उघडल्याने परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, आता पुढील ४८ तासात महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई, कोकण, पुणे, नाशिकच्या काही भागात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याने या संदर्भात ट्वीट करत माहिती दिली आहे. आज मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, रायगडसह कोकणसह संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस सुरु आहे. दरम्यान, कोकणासह राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे महत्वाच्या कामाव्यतरिक्त घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या दहा दिवसांत पावसाच्या कहरात ८० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी नागपुरात पुरात गाडी वाहून गेल्याने ६ जणांना जलसमाधी मिळाली तर पुणे जिल्ह्यात ४ जणांचा बळी गेला आहे. खान्देशात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पालघर, पुणे शहर, गडचिरोली या ठिकाणी पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे अशी सूचना प्रशासनाने दिली आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळांना गुरुवारी सुट्टीगेल्या चार दिवसांपासून पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे पुणे शहरातील पहिली ते दहावीच्या शाळा राहणार बंद राहणार आहेत. पुणे पाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये देखील सर्व शाळा उद्या बंद राहणार आहेत. याबद्दलचा निर्णयाचे पिंपरी-चिंचवड महापालिकेने परिपत्रक काढले आहे. पुढील दोन दिवस हवामान विभागाकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसराला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही महापालिकेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.