रत्नागिरी - गेले दहा दिवस संततधार सुरू असलेल्या आणि बुधवारी रात्री मुसळधार कोसळलेल्या पावसाने २००५ च्या अस्मानी संकटाची आठवण करुन दिली आहे. चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, खेड येथे पूर आला आहे. चिपळूण तालुक्यात पेढे येथे दरड कोसळून तीनजण त्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
येथे कोसळत पावसामुळे अवघा परिसर जलमय झाला असून २००५ मधील महापुराची पुनरावृत्ती झाल्याप्रमाणे चित्र निर्माण झालं आहे. अनेक घरं पाण्याखाली गेली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळपासून अनेकांना पुरातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच एनडीआरएफची टीम बोलावण्यात आली आहे. या पावसात तालुक्यातील पेढे-कुंभारवाडी येथे दरड कोसळून तिघेजण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेने कोसळणाऱ्या पावसामुळे राजापूर शहराला सलग १४ दिवस पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. राजापूर शहरातून वाहणाऱ्या अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्याप्रमाणावर वाढ झाल्याने नदीकिनाऱ्यालगतच्या गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राजापूर तालुक्यातुन वाहणाऱ्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाल्याने नदीकिनाऱ्यालगतची अनेक गावे व वाड्या पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे . अर्जुना नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असून रायपाटण गांगणवाडीतील नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नाटे येथील ठाकरेवाडीचा संपर्क अद्यापही तुटलेलाच आहे. प्रिंदावण तारळ भागातून वाहणाऱ्या सुक नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन मळेशेती गेले १४ दिवस पाण्याखाली राहिल्याने शेतकरी वर्गाचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे.
गेले दोन आठवडे संततधारेने लागणाऱ्या पावसामुळे राजापूर शहराला गेले १४ दिवस पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे . सातत्याने पुराच्या पाण्यात चढ उतार राहिल्याने बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अर्ध्याहून अधिक बाजारपेठ सातत्याने पुराच्या पाण्याखाली असल्यामुळे गेले पंधरा दिवस बाजारपेठ बंदच आहे. गेले चार महिने कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने बाजारपेठ बंद होती मात्र त्यानंतर आता पावसामुळे सुमारे १५ दिवस बाजारपेठ बंद राहिल्याने राजापूर शहरातील व्यापारी मेटाकुटीला आले आहेत.
संगमेश्वर बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले असून रामपेठ घरांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. मारुती मंदिर देवरुख मार्गावर पाणी चढण्याची शक्यता आहे. अतिवृष्टी मुळे बावनदीला पुर मुंबई - गोवा महामार्गावरील ब्रिटीशकालीन बावनदी पुलावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत वाहतुक थांबवण्यात येणार आहे. तालुक्यातील निवधे पूल फूट ब्रीज वाहून गेला. तसंच निवधे गावाचा संपर्क तुटला.