मुंबई: राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाढत आहे. गेल्या आठवड्याभरात कोरोना रुग्णांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. एका बाजूला कोरोना लसीकरणाचा वेग वाढत असताना दुसऱ्या बाजूला कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढत आहे. आज राज्यात १५ हजार ८१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यापैकी १ हजार ६४६ रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत.राज्यात आज १५ हजार ८१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर ११ हजार ३४४ जणांना डिस्चार्ज मिळाला. राज्यात आज ५६ कोरोना रुग्ण दगावले. राज्यात आतापर्यंत २२ लाख ८२ हजार १९१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी २१ लाख १७ हजार ७४४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ५२ हजार ७२३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला १ लाख १० हजार ४८५ जणांवर उपचार सुरू आहेत.
मुंबईत एका दिवसात १ हजार ६४६ बाधित आढळले असून चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण संख्या वाढत असल्याने सक्रिय रुग्णांचा आकडाही आता १२ हजार ४८७ वर पोहोचला आहे. कोरोनाचा प्रसार मुंबईत पुन्हा झपाट्याने वाढू लागला आहे. त्यामुळे रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी आता १९६ दिवसांवर आला आहे.
गेल्या आठवड्यापासून मुंबईत दररोज एक हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. डिसेंबर २०२० मध्ये कोरोनाचा प्रसार नियंत्रणात येऊ लागल्याने रुग्णांची संख्या पाचशेपर्यंत कमी झाली होती. मात्र यामध्ये आता पुन्हा वाढ झाल्यानंतर आतापर्यंतच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद शुक्रवारी झाली. शुक्रवारी १ हजार १२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये तीन पुरुष आणि एका महिला रुग्णाचा समावेश आहे. यापैकी तीन रुग्णांना दीर्घकालीन आजार होते, दोन रुग्ण ४० वर्षांखालील आणि दोन रुग्ण ६० वर्षांवरील आहेत. आतापर्यंत ११ हजार ५१९ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ३५ लाख १६ हजार ८७५ चाचण्या करण्यात आल्या आहेत.