चेतन ननावरे. मुंबईरेशनिंग, रॉकेल आणि गॅस अनुदानासाठी सक्ती असलेल्या आधार कार्ड नोंदणी प्रक्रियेत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर असून, उत्तर प्रदेशात सर्वाधिक नोंदणीची नोंद करण्यात आली आहे. नोव्हेंबर २०१५ पर्यंत झालेल्या नोंदणी प्रक्रियेत राज्यात १० कोटी १४ लाख २६ हजार ३७० लोकांनी नोंदणी केल्याचे निदर्शनास आले आहे.सर्वाधिक नोंदणी करणाऱ्या राज्यात उत्तर प्रदेशचे नाव पहिले असून यूपीमध्ये एकूण १३ कोटी ३२ लाख ५१ हजार ९१४ लोकांनी नोंदणी केल्याचा माहिती आहे. यूपीमध्ये सुमारे २१ कोटी ११ लाख ५ हजार ३८१ लोक राहत असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यानुसार ही टक्केवारी ६३.१ टक्के इतकी कमी आहे, याउलट महाराष्ट्रात ११ कोटी ८८ लाख ६१ हजार ४२७ नागरिक राहत असल्याचा अंदाज असून, त्यानुसार राज्यातील नोंदणीचे प्रमाण ८५.३ टक्के इतके आहे.आसाम आणि मेघालय राज्यांनी केंद्र सरकारच्या आवाहनाकडे पाठ फिरवली आहे. या दोन्ही राज्यांमध्ये २ टक्क्यांहून कमी नोंदणी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आसाममध्ये सुमारे ३ कोटी २९ लाख ६८ हजार ९९७ लोक राहत असून, त्यातील केवळ ६ लाख ४१ हजार १९८ नागरिकांनी आधार कार्ड नोंदणी केली आहे. हे प्रमाण १.९ टक्के इतके आहे, तर मेघालयमध्ये सर्वात कमी नोंदणी झाली असून, येथील सुमारे ३१ लाख ३५ हजार १५० लोकांमधील केवळ ५७ हजार ०२० लोकांनी नोंदणी केली आहे. याचाच अर्थ, फक्त १.८ टक्के लोकांनीच नोंदणी करण्याची तसदी घेतली आहे. पूर्वेकडील राज्यांची नोंदणीकडे पाठपूर्वेकडील राज्यांमधून आधार कार्ड नोंदणीस अल्प प्रतिसाद मिळाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यात प्रामुख्याने मेघालय, आसाम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर या राज्यांचा समावेश आहे. यामधील मणिपूर वगळता, एकाही राज्यामध्ये ५० टक्क्यांहून अधिक नोंदणी झालेली नाही.
आधार नोंदणीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर ; उ. प्र. अव्वल
By admin | Published: December 28, 2015 3:48 AM