मुंबई: राज्यातील जनतेसाठी दिलासादायक वृत्त आहे. नवीन कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण पुन्हा वाढल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ११ हजार ०३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९५.९३ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यांत एकूण १० हजार ०६६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports 10066 new corona cases and 163 deaths in last 24 hours)
मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यांत १० हजार ०६६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत १६३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ११ हजार ०३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५७ लाख ५३ हजार २९० रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर १.९९ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण १ लाख २१ हजार ८५९ इतकी आहे.
मुंबईकरांना दिलासा
मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ८६३ नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत ७११ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत २३ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १५ हजार ३३८ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे १४ हजार ५७७ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.९ टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालावधी ७२८ दिवसांवर गेला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ तोडग्यावर काँग्रेसचा आक्षेप; आव्हाडांच्या निर्णयावर पटोले नाराज!
दरम्यान, राज्यात एकूण ४ कोटी ०१ लाख २८ हजार ३५५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५९ लाख ९७ हजार ५८७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यात ५ लाख ९२ हजार १०८ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, ४ हजार २२३ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.