मुंबई: राज्यातील जनतेसाठी दिलासादायक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांची संख्येत किंचित घट झाली असली, तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत तब्बल ३१ हजार ९६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९३.४६ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यांत एकूण २० हजार २९५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports 20 295 new corona cases and 31 964 patients have been cured in last 24 hours)
मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यांत २० हजार २९५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. याच कालावधीत ४४३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ३१ हजार ९६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५३ लाख ३९ हजार ८३८ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर १.६४ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण २ लाख ७६ हजार ५७३ आहे.
मुंबईकरांनाही दिलासादायक वृत्त
गेल्या सलग १० दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या ३० हजारांच्या खाली राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ०४८ नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत १ हजार ३५९ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत २५ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १४ हजार ८३३ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे २७ हजार ६१७ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.१७ टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालाावधी ३९९ दिवसांवर गेला आहे.
दरम्यान, राज्यात एकूण ३ कोटी ४६ लाख ०८ हजार ९८५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५७ लाख १३ हजार २१५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यात २० लाख ५३ हजार ३२९ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, १४ हजार ९८१ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.