मुंबई: राज्यातील जनतेसाठी काहीसे चिंताजनक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होताना पाहायाला मिळत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ४ हजार ४३० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९७.०३ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यात एकूण ४ हजार ४५६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports 4456 new corona cases and 183 deaths in last 24 hours)
मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात ४ हजार ४५६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत १८३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ४ हजार ४३० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ७७ हजार २३० रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण ५१ हजार ०७८ इतकी आहे.
मुंबईकरांच्या चिंतेतही काहीशी भर
गेल्या सलग अनेक दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या १० हजारांच्या खाली राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत केवळ ४१६ नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत ३२९ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत ४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १५ हजार ९८१ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे ३ हजार १८७ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.०५ टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालावधी १४७९ दिवसांवर गेला आहे.
दरम्यान, आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ४१ लाख ५४ हजार ८९० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ६९ हजार ३३२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच राज्यात २ लाख ९० हजार ४२७ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, २ हजार ०७१ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. मालेगाव, धुळे, जालना, हिंगोली, नांदेड, वाशिम, या पाच जिल्ह्यात शून्य रुग्ण आढळले आहेत.