राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा मोठ्या प्रमाणावर वाढू लागले आहेत. मुंबईनंतर एकट्या अमरावती जिल्ह्यात आज 498 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. कोरोनाचा वाढता आकडा मोठे संकट घेऊन येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यात लॉकडाऊन लावणार नाही, परंतू निर्बंध घालावे लागतील असा इशारा दिला आहे. स्थानिक पातळीवर कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. (Maharashtra reports 4,787 new COVID-19 cases, 3,853 discharges, and 40 deaths in the last 24 hours, as per State Health Department.)
राज्यात आज दिवसभरात 4,787 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. मंगळवारी हा आकडा 3,663 एवढा होता. यामध्ये आज जवळपास 1100 रुग्णांची वाढ झाली आहे. तर 40 जणांचा मृत्यू झाला आहे. 3,853 जण बरे झाले आहेत, असे आरोग्य खात्याने सांगितले. राज्यात एकूण 20,76,093 कोरोनाबाधित सापडले आहेत. यापैकी 19,85,261 बरे झाले आहेत. सध्या 38,013 रुग्ण उपचार घेत आहेत. मृतांचा आकडा 51,631 झाला आहे. मुंबई, ठाणे, पुण्यामध्ये सर्वाधिक रुग्ण उपचार घेत आहेत. अनुक्रमे 4530, 4681, 7509 रुग्ण आहेत. राज्यातील मृत्यूदर 2.49 टक्के एवढा आहे.
मुंबईत आज 721 रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या दोन महिन्यातील ही सर्वाधिक वाढ आहे. 721 रुग्णांपैकी 82 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत. त्यामुळे बरचेसे रुग्ण हे होमक्वॉरन्टीन आहेत. 98 टक्के वाढलेल्या केसेस या हायराईज सोसायटीमधील आहेत. झोपडपट्टी किंवा दाटीवाटीच्या भागातून जास्त रुग्ण नाहीत.
उद्धव ठाकरे काय म्हणालेले...
सर्व व्यवहार सुरू झाले आहेत, निर्बंध शिथिल केले आहेत. परंतु कोरोना संपला असे सगळे वागत आहेत, ज्येष्ठ नागरिकांना धोक्यात आणतो आहोत. कोरोनाला अटकाव करण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन हवा की थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचे हे जनतेने ठरवायचे आहे, असे सांगतानाच नियम पाळणार नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. यावेळी ठाकरे यांनी अनेक सूचना केल्या.
पुन्हा कडक निर्बंध- लग्नसमारंभ, लोकांच्या गाठीभेटी, पार्ट्या व इतर सामाजिक कार्यक्रमात आरोग्यविषयक नियम पाळले जात नसतील तर कारवाई होणार- उपाहारगृह, हॉटेल्समध्ये नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून आल्यास परवाना होऊ शकतो रद्द- ज्या विवाह किंवा इतर समारंभात मास्क व इतर नियम पाळलेले दिसणार नाहीत त्या हॉल्स किंवा सभागृहांचे परवाने रद्द होणार- कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमासाठी आता पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल- सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंचे पालन होत नसल्यास कारवाई होणार