मुंबई: राज्यातील जनतेसाठी काहीसे दिलासादायक वृत्त आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ५ हजार ८९० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९५.६४ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यांत एकूण ९ हजार ८३० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports 9830 new corona cases and 236 deaths in last 24 hours)
मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यांत ९ हजार ८३० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत २३६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ५ हजार ८९० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५६ लाख ८५ हजार ६३६ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर १.९५ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण १ लाख ३९ हजार ९६० इतकी आहे.
मुंबईकरांना काहीसा दिलासा
मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ६६६ नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत ७४१ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत २० रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १५ हजार २४७ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे १४ हजार ८०७ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.९ टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालाावधी ७३४ दिवसांवर गेला आहे.
दरम्यान, राज्यात एकूण ३ कोटी ८८ लाख ५७ हजार ६४४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५९ लाख ४४ हजार ७१० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यात ८ लाख ५० हजार ६६३ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, ४ हजार ९६४ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.