"दरवर्षी पाडव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा होते. परंतु यापूर्वी ती कोरोनामुळे झाली नाही. राज ठाकरे महाराष्ट्राचे फायर ब्रँड आहे. परंतु शनिवारच्या सभेत भाजपनं जी सुडबुद्धीची कारवाई केली तिथं कुठेतरी हे फायब्रँड पुष्पासारखे फ्लॉवर झाले का? असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनात येतो," असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलं. शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गुढीपाडव्यानिमित्त सभा पार पडली. या सभेदरम्यान त्यांनी अनेकांवर जोरदार निशाणा साधला.
"राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातीयवाद नाहीच. या पक्षात सर्व जातीची, पंथाची, धर्माची लोकं पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मंत्रीदेखील आहेत. अशा पक्षात जातीयवाद असूच कसा शकतो. जातीयवाद असताच तर विशिष्ट समाजाची लोक त्यात असायला हवी होती. परंतु तसं नाही. त्या वक्तव्याला काही अर्थ नाही," रुपाली पाटील म्हणाल्या. ज्या सुडबुद्धीनं भाजपनं ईडी लावली त्याला न घाबरता उभे राहणारे शरद पवार हे देशातील एकमेव नेते आहेत. शरद पवार पाठीशी ठामपणे उभे राहिल्यानं महाविकास आघाडीच्या लोकांच्या मागे हा ससेमिरा लावल्यानंतरही ते घाबरत नसल्याचंही त्या म्हणाल्या.