मुंबई - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. एकूण रुग्णांची संख्या तीन कोटींवर पोहोचली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 6,358 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्रातही कोरोनाचा धोका आहे. अनेक नेते मंडळींना कोरोनाची लागण झाली आहे. याच दरम्यान आता राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना कोरोनाची लागण (Corona Virus) झाल्याची माहिती मिळत आहे. वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती दिली. यासोबतच त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना देखील खबरदारी घेण्याची विनंती केली असून आपली प्रकृती उत्तम असल्याचं म्हटलं आहे.
सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात वर्षा गायकवाड या दररोज सहभागी होत आहेत. सोमवारी देखील त्या उपस्थित होत्या. त्यानंतर आता मंगळवारी (28 डिसेंबर) गायकवाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. "काल संध्याकाळी काही प्राथमिक लक्षणं जाणवल्यानंतर माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी लक्षणं तुलनेने सौम्य आहेत. मी आता ठीक आहे आणि मी स्वतःला आयसोलेट केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून जे मला भेटले त्यांनी खबरदारी घ्यावी अशी मी विनंती करते" असं म्हटलं आहे.
विधिमंडळ परिसरात कोरोनाचा उद्रेक; मंत्री के. सी. पाडवी यांच्यासह 35 जण कोरोनाबाधित
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या आरटीपीसीआर चाचणीत तब्बल 35 लोकांना कोरोना बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये मंत्री के. सी. पाडवी, 3 पत्रकार, पोलीस कर्मचारी, विधिमंडळ आणि मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
राज्यात सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. त्यासोबतच ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून 2 हजार 300 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 35 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यात आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. के. सी. पाडवी अधिवेशासाठी उपस्थित होते. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून ते घरीच आयसोलेशनमध्ये आहेत.