मुंबई, दि. 18 - देशभरात स्वाईन फ्लू या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले असून अनेकजण या आजाराचे बळी पडले आहेत. स्वाईन फ्लूने देशभरात थैमान घातला असताना महाराष्ट्र आणि गुजरातमधील मृतांचा आकडा धक्कादायक आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये स्वाईन प्लूचे सर्वाधिक बळी सापडले आहेत. महाराष्ट्रात स्वाईन फ्लूचे एकूण 3750 रुग्ण सापडले असून 381 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने 1 जानेवारीपासून ते 6 ऑगस्ट 2017 पर्यंत जमा केलेल्या माहितीच्या आधारे ही आकडेवारी जाहीर केली आहे.
कर्नाटकमध्ये 2805 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून, तामिळनाडूत एकूण 2956 रुग्ण सापडले आहेत. मात्र येथील रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत असल्याचं दिसत आहे. येथील फक्त 15 जणांचा मृत्यू झाला आहे.
गुजरातमध्ये स्वाईन फ्लूची लागण झालेल्यांची संख्या इतर राज्यांशी तुलना करता फार कमी आहे. गुजरातमध्ये फक्त 903 केसेस समोर आली आहेत. मात्र मृतांचा आकडा जास्त असून एकूण 138 जणांचा बळी गेला आहे. तेलंगणामध्ये 1493 तर केरळमध्ये 1317 स्वाईन फ्लूच्या केसेस समोर आल्या आहेत. मृतांच्या आकडेवारीत महाराष्ट्रानंतर गुजरातचा क्रमांक लागला आहे. यामुळे राज्याच्या आरोग्य योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं आहे. स्वाईन फ्लू रोखण्यासाठी आणि तो झाल्यास मिळणा-या उपचारांची कमतरता महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये असल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.
या तुलनेत दिल्लीमध्ये स्वाईन फ्लूचे 928 रुग्ण सापडले असून, फक्त चार जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये स्वाईन फ्लूमुळे इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 2015 मध्येही महाराष्ट्र आणि गुजरात पहिल्या क्रमांकावर होते. महाराष्ट्रात एकूण 8583 केसेस सापडल्या होत्या, ज्यामधील 905 जणांचा मृत्यू झाला होता. महाराष्ट्र त्यावेळी पहिल्या क्रमांकावर होता. गुजरातमध्ये 7180 केसेस समोर आल्या होत्या, तर 517 जणांचा मृत्यू झाला होता. गुजरातनंतर राजस्थानमधील मृतांचा आकडा सर्वात जास्त होता. राजस्थानमध्ये 472 जणांचा बळी गेला होता.
स्वाइन फ्लूची लक्षणे - स्वाइन फ्लूची लक्षणे ही सर्व साधारण फ्लूसारखीच असतात. यात थंडी, ताप १०० अंश फॅ. पेक्षा जास्त सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब व कधी कधी पोटदुखी इत्यादी लक्षणांचा समावेश असतो.
आपणास फ्लू किंवा साधी सर्दी झाली आहे हे कसे ओळखावे?फ्लू किंवा साधी सर्दी ओळखण्यासाठी एक खूण आपणास उपयोगी पडते. आपणास फ्लूची लक्षणे सर्दीच्या लक्षणांच्या काही काळ आगोदर दिसतात. तसेच ही लक्षणे अधिक तेव्र स्वरुपाचे असतात. जर फ्लू झाला असेल तर आपणास दोन ते तिन आठवडे सतत अशक्तपणाचा आभास होत राहतो. तसेच नाक सतत बंद राहते किंवा वाहत राहते, डोकेदुखी व घसादुखी येते.
स्वाइन फ्लूचा प्रसार कसा होतो?नव्या स्वैअन फ्लू विषाणूं तीव्र संसर्ग पसरवतात, याचा प्रसार माणसापासून माणसाला होतो. स्वाइन फ्लू विषाणू बाधित व्यक्तीच्या खोकण्याने किंवा शिंकण्याने हवेत उडणा-या तुषारातील विषाणू धूलिकणावेष्टीत स्वरुपात जिवंत राहतात. श्वसन करताना नाकातून किंवा तोंडावाटे याचा संसर्ग होऊ शकतो. तसेच अशा बाधित व्यक्तीच्या नाकावाटे किंवा तोंडावाटे बाहेर निघणा-या कफ हातावर लागल्यास त्यानंतर तो व्यक्ती जिथे जिथे स्पर्ष करेल तिथे तिथे संसर्ग होऊ शकतो.
दक्षता कशी घ्यावी?असे लोक जे खूप आजारी आहेत व ज्यांना स्वाइन फ्लू असण्याची शक्यता आहेत अशांना प्रतिबंधात्मक औषधे दिली जाऊ शकतात व त्यातून काही प्रमाणात बचाव होऊ शकतो. अशी औषधे ७०% ते ९०% प्रभावी ठरतात. पण ह्या औषधांचावापर डॉक्टर व त्या व्यक्तीच्या आजाराच्या स्वरुपावर अवलंबून असतात.