पुणे : सहिष्णुता हा भारतीय तत्त्वज्ञानाचा गाभा; शांतता आपल्या संस्कृतीचा पाया आहे. सध्याच्या काळात राजकारण, समाजकारणाचा पाया ढासळू लागला आहे. बेभान राजकारण्यांना ताळ्यावर ठेवायचे असेल तर तत्त्वज्ञांनी भारतीय तत्त्वज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचवायला हवे. इतरांना दोष न देता आत्मपरीक्षण करण्याची हीच वेळ आहे. महाराष्ट्र एकसंध ठेवायचा असेल तर एकतेचे सूत्र अवलंबायला हवे. अखंडित महाराष्ट्र जपण्याचे काम लेखणीतून झाले पाहिजे, असे मत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.रामकृष्णहरी कृषी प्रतिष्ठानतर्फे ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांना ‘प्रा. रामकृष्ण मोरे जीवनगौरव पुरस्कारा’ने मंगळवारी सन्मानित करण्यात आले. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी द्वादशीवार यांच्या ‘कोऽऽहम’ या तत्त्वचिंतनात्मक कादंबरीच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशनही करण्यात आले. माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस यशवंत हप्पे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती रामभाऊ बराटे, उल्हास पवार आदी मान्यवर उपस्थित होते. ‘सभापती ना धड इकडचा असतो, ना तिकडचा’ अशी टिपण्णी करत नाईक निंबाळकर म्हणाले, ‘‘राजकारणी गेल्यावर त्याच्या नावाचा एखादा फलक, अर्धाकृती पुतळा यापलीकडे त्याचे स्मरण राहात नाही. जग वेगवान झाले आहे, त्याच वेगाने स्मृतिभ्रंश होत आहे की काय, अशी शंका उत्पन्न होते. राजकारणात फार कमी लोक एकमेकांची आठवण काढतात. एखादी गोष्ट ठसवून सांगणे, हेच आमचे राजकीय तत्त्वज्ञान आहे’’, असे म्हणताच सभागृहात हशा पिकला. ज्येष्ठ पत्रकार अभिनंदन थोरात यांनी प्रास्ताविक केले.
महाराष्ट्र अखंडच राहायला हवा
By admin | Published: November 09, 2016 3:00 AM