मुंबई: मगील काही दिवसांपासून राज्यभर सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप(ST Strike) आता लवकरच मिटण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत सदाभाऊ खोत(Sadabhau Khot) यांनी एक सूचक विधान केलं आहे. 'आंदोलन हे रबरासारखं असतं, जास्त ताणल्यास तुटतं', असे ते म्हणाले. दरम्यान, एसटीच्या विलिनीकरणासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतनात अंतरिम वाढ देण्याचा सरकारने दिलेल्या प्रस्तावावर एसटी कर्मचारी सकारात्मक असल्याची माहिती मिळतीये, त्यामुळे आता हा संप लवकरच मिटणार असल्याचं बोललं जात आहे.
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब(Anil Parab) यांनी सह्याद्री अतिथीगृहावर बोलावलेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळानं पर्याय द्यावेत असही परबांनी म्हटलं आहे. तसेच, सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या अंतरिम वेतनवाढीचा प्रस्ताव शिष्टमंडळापुढे ठेवण्यात आलाय. सरकारच्या प्रस्तावावर शिष्टमंडळ चर्चा करुन आज पुन्हा बैठक होणार आहे, या बैठकीत निर्णयाची शक्यता आहे.
सदाभाऊ खोत म्हणाले, आम्ही पोटतिडकीने आमची बाजू मांडली. राज्यातील निलंबित झालेला कर्मचारी आहे, तो आझाद मैदान येथे येणार आहे. आज सरकारने विलिनीकरण करणाची भूमिका स्पष्ट केली आहे. आज पुन्हा 11 वाजता बैठक होईल. भावनिक विचार न करता आर्थिकदृष्टीने देखील विचार व्हावा आणि यासंदर्भात सकाळी काही अर्थतज्ज्ञांशी चर्चा करू, असं खोत यांनी म्हटलं आहे. तर, सकारात्मक चर्चा झाल्याचं भाजप आमदार गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar) यांनीही सांगितलं आहे.