उभा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी, कर्नाटक सीमेवरील मराठी भाषिकांना अजित दादांचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 10:29 AM2022-12-27T10:29:56+5:302022-12-27T10:32:26+5:30
"कर्नाटक सीमावरती भागातील मराठी भाषिकांवरील अन्याय थांबण्यासाठी जे सर्वानुमते ठरेल ते आम्हाला मान्य..."
आम्ही सर्व विरोधी पक्षाचे लोक बसून, आजच्या विधानसभेच्या कामकाजासंदर्भातली आमची भूमिका ठरवणार आहोत. पण आज पहिल्या आठवड्यातील विरोधी पक्षांचा प्रस्ताव आमच्या विदर्भाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्यावर चर्चा करणे, आमच्या सर्वाचे कामच आहे. काल आम्ही सर्वांनी आग्रह धरला होता, सीमाप्रस्तावासंदर्भातील जो प्रस्ताव आला आहे. तो आम्ही एक मताने मंजूर करूच आणि त्यात काही सूचना असतील तर त्याचाही अंतर्भाव करण्याचा प्रयत्न आम्ही करू, असे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे.
पवार म्हणाले, मराठी भाषिक लोकांना सांगू इच्छितो, की संपूर्ण विधीमंडळ तुमच्या पाठीशी आहे, उभा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे. हे आम्हाला या कृतीतून दाखवायचे होते. याच बरोबर भ्रष्टाचारासंदर्भातील वेगवेगळ्या मंत्र्यांचे वेगवगळे प्रकार समोर येत आहेत. त्यासंदर्भात उच्च न्यायालयाने ताशेरे ओढलेले आहे. एनआयटी संदर्भातही उच्चन्यायालयाने त्यासंदर्भात काही गोष्टींचा उल्लेख केला होता. आजही काही वृत्तपत्रांत काही मंत्र्यांची प्रकरणे आली आहेत. त्यासंदर्भातही आम्ही अधिकची माहिती मिळवत आहोत. कारण उद्याच्याला मी तरी विरोधीपक्ष म्हणून एखादी भूमिका मांडताना पुरावे नसताना त्यासंदर्भात वक्तव्य करणे मला योग्य वाटत नाही. त्यामुळे ठोस पुरावे असतील तर त्यासंदर्भात मी भूमिका मांडेल.
याच बरोबर, जत मधील काही गावे अक्कलकोटमधील काही गावेही, आम्हाला कर्णाटकात जायचे असल्याचे म्हणत आहेत, तेही एक त्यात टाका, अेस म्हटल्यास आणखी नवे प्रश्न निर्माण होतील. बेळगाव, कारवार, निपानी आणि बिदरचा भागातील ज्या मराठी भाषिकांवर खरो खरच अन्याय होतो. त्यांचे यासंदर्भात काय मत आहे आणि आपण हा भाग केंद्रशासित करायचा म्हटल्यास केंद्र सरकार त्याला मदत करणार आहे का? कारण हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना, त्याही बाबी तपासून घ्याव्या लगती. यासाठी सर्वांचे एकमत असताना तर आमचा विरोध असल्याचे काहीच कारण नाही. ज्या मराठी भाषिकांवर तेथे अन्याय होत आहे. ते थांबण्यासाठी जे सर्वानुमते ठरेल ते आम्हाला मान्य आहे, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.