ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ३ - ज्या महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली ते राज्य एकसंधच रहावे असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी स्वतंत्र विदर्भाला विरोध दर्शवला आहे. पुण्यातील पत्रकार परिदषदेदरम्यान बोलताना त्यांनी ही भूमिता मांडली. त्याचबरोबर महाराष्ट्रापासून वेगळं व्हायचं की नाही हा निर्णय नागरिकांनी घ्यायचा आहे असेही ते म्हणाले.
स्वतंत्र विदर्भाबाबत जनमत घेतल्यावर जनता ज्याच्या पारड्यात मत टाकेल तो कौल आम्हाला मान्य असेल असे पवार म्हणाले. मात्र हा निर्णय नेत्यांनी नव्हे तर जनतेने घ्यावा असा पुनरुच्चार त्यांनी केला. तसचे स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा करुन ज्या नेत्यांनी निवडणूक लढवली त्यांच्या हातात काहीच पडले नसल्याचे त्यांनी सांगितले. पवारांच्या या वक्तव्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पवारांचे वक्तव्य दुर्दैवी असून स्वतंत्र विदर्भ होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही अशी प्रतिक्रिया वैदर्भिय नेते वामनराव चटप यांनी दिली.
आघाडी तुटण्यास मुख्यमंत्री जबाबदार
काँग्रेस - राष्ट्रवादीची गेल्या १५ वर्षांची आघाडी तुटण्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जबाबदार असल्याचा आरोप यावेळी पवारांनी केला. दीड महिन्यापूर्वी आपली काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी भेट झाली होती व विधनासभा निवडणूक एकत्र लढवण्याबाबत त्यांनी सकारात्मक प्रतिसाद त्यांनी दिला होता. निवडणूकीबाबत राज्य पातळीवर निर्णय घेण्यात यावा असे त्या बैठकीत ठरले होते. मात्र त्यानंतरही ही आघाडी तुटली असे पवार म्हणाले.