मुंबई : कोरोनाच्या काळात कुष्ठरोग्यांचे सर्वेक्षण करायचे राहून गेले होते. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी कुष्ठरोग्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून साधारण ३ लाख ६७ हजार ७७ संशयित रुग्ण आढळले आहेत. या सर्वेक्षणामुळे नवीन कुष्ठरुग्णांना लवकरात लवकर शोधून त्वरीत औषधोपचाराखाली आणण्यासाठी प्रवृत्त करण्यात येईल. उपचाराच्या माध्यमातून राज्य कुष्ठरोग मुक्त करण्याचा निर्धार आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी व्यक्त केला.
या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी, कुष्ठरोग बरा झालेल्या लोकांच्या देखील अनेक समस्या आहेत. त्यांना अपंगाचे प्रमाणपत्र, त्यांच्या रोजगाराचा प्रश्न, त्यांच्या सन्मानाचा प्रश्न या सर्व प्रश्नावर राज्य सरकार तर्फे समिती बनवण्यात येणार आहे, असे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.
तसेच, या समितीत अनेक मान्यवर असतील. यामध्ये सचिव पातळीवर एक समिती गठीत केली जाईल. या समितीत कुष्ठरोग निर्मूलनासाठी आनंदवनात कित्येक वर्ष काम करणारे विकास आमटे, प्रकाश आमटे, पद्मश्री गजानन माने यांचाही सहभाग असेल, अशी माहिती विधानसभेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली.
दरम्यान, ही माहिती देताना, २०२७ पर्यंत महाराष्ट्र राज्य कुष्ठरोग मुक्त करण्याचा निर्धार देखील आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केला. तसेच, तो दिवस दूर नाही, ज्याप्रमाणे देवीरोगा सारखा कुष्ठरोग सुद्धा इतिहासजमा होईल, असा विश्वासही आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी व्यक्त केला.