बाळासाहेब बोचरे मुंबई : महाराष्ट्राची जनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या लालपरीने अनेक उन्हाळे पावसाळे अन् अनेक चढउतार पाहिले. वाढलेला तोटा पाहता मधल्या दहा वर्षांत ही परी आपला संसार गुंडाळते की काय असे वाटत असताना आपली लालपरी आता रुपडं बदलू लागली आहे. वयाची पंचाहत्तरी ओलांडली, वय वाढलं तरी नव्या जोमाने धावू लागली आहे. प्रवाशांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू लागली असून डिझेल ते इलेक्ट्रिक बसपर्यंत तिने मजल मारली आहे. हिच्यामध्ये बसून आरामदायी गारेगार प्रवास हवाहवासा वाटू लागला आहे.
१ जून १९४८ रोजी अहमदनगर ते पुणे या मार्गावर धावलेल्या पहिल्या बसचे कंडक्टर लक्ष्मण केवटे यांचे नुकतेच निधन झाले. सुरुवातीला बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन नावाने ही बस चालली. त्यानंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर १९६० पासून तिचे नामांतर.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ असे झाले. बेडफोर्ड कंपनीच्या केवळ ३६ बसच्या ताफ्यासह या महामंडळाची सुरुवात झाली.आज सर्व मिळून बसची संख्या १८ हजारांपर्यंत गेली आहे. कालांतराने टाटा आणि लेलॅँड कंपनीच्या बस महामंडळात आल्या. केवळ निवडक मार्गावरच या बस धावत असल्याने एखाद्या गावात एसटी बस असली तरी ती एक नवलाई होती. लाल आणि पांढरा पट्टा मारलेली ही बस जेव्हा झाडीतून धावायची तेव्हा वाघीण धावल्याचा भास व्हायचा.
एशियाडची क्रेझ१९८२ साली पुण्यामध्ये आशियायी स्पर्धा भरवल्या गेल्या. त्यावेळी बालेवाडी ते पुणे खेळाडूंना ने-आण करण्यासाठी हिरव्या पांढऱ्या रंगाच्या विशेष आरामदायी बस महामंडळास सुपूर्द करण्यात आल्या. म्हणून या बसची एशियाड बस म्हणूनच ओळख झाली. स्पर्धा संपल्यानंतर त्या बस विशेष सेवा देणाऱ्या बस म्हणून दिमाखात मिरवू लागल्या. १९८२ नंतर महामंडळाने २० वर्षांनी स्वत:च्या मालकीच्या तशा बस बांधल्या. कालांतराने या बसला हिरकणी असे नाव दिले. या गाडीला जांभळा व पांढरा असा रंग देण्यात आला.
शिवशाही आली : १०१४ साली महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या शिवसेना-भाजप सरकारच्या काळात एसटी बसला ऐतिहासिक नावे देण्यात आली. परिवर्तन (लालपरी), हिरकणी, यशवंती (मिडीबस) या बसनंतर शिवशाही आणि शिवनेरी आणि अश्वमेध या आरामदायी आणि वातानुकूलित व स्लीपर बस महामंडळाच्या ताफ्यात आणल्या.