मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्यानं वाढत आहे. मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा १०० च्या वर गेला आहे. तर राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या तीनशेपेक्षा अधिक आहे. त्यातच निझामुद्दीनमधील तबलिगी जमातीचे कित्येक जण राज्यात परतल्यानं चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे राज्य कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचलं आहे की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. मात्र अशी कोणतीही परिस्थिती नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्ट केलं.राज्यात कोरोनाचा तिसरा टप्पा सुरू झालेला नाही. आपण अजूनही दुसऱ्याच टप्प्यात असल्याची माहिती टोपेंनी दिली. तिसऱ्या टप्प्यात समूह संसर्ग सुरू होतो. मात्र अद्याप तरी राज्यात तशी परिस्थिती निर्माण झालेली नाही. परदेशातून आलेल्या काहींना कोरोनाची बाधा झालेली आहे. तर काही जण कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यानं त्यांना लागण झाली आहे. आपण अजूनही दुसऱ्याच टप्प्यात आहोत. मात्र नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं. दिल्लीच्या निझामुद्दीनमधल्या मरकजमध्ये सहभागी होऊन राज्यात परतलेल्या सगळ्यांचा शोध सुरू असल्याची माहिती राजेश टोपेंनी दिली. याबद्दलची माहिती पोलीस महासंचालकांकडे पोहोचली आहे. त्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी केली जाईल आणि उपचारांची गरज असलेल्यांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात येईल, असं टोपेंनी सांगितलं. राज्यभरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वेगानं वाढत आहे. त्यावर भाष्य करताना टोपेंनी वाढत्या वैद्यकीय तपासण्यांचा संदर्भ दिला. गेल्या काही दिवसांत आपण मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या करत आहोत. शासकीय रुग्णालयांसोबतच काही खासगी लॅब्सनादेखील तपासण्या करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. तपासण्यांचं प्रमाण वाढल्यानं रुग्णांची संख्या वाढल्याचं दिसून येत आहे. यामुळे सद्यस्थिती समोर येत आहे. त्यामुळे ही बाब चांगलीच आहे. कोरोनाबाधित लवकर आढळून आल्यास त्याच्यावर उपचार सुरू होऊ शकतात, असं टोपे म्हणाले.
CoronaVirus: राज्य कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात?; आरोग्यमंत्री टोपे म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2020 7:08 PM