ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाली असून 2014 ते 2015 मध्ये आकडा 42 टक्क्यांनी वाढला आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 2014 मध्ये एकूण 5650 शेतक-यांनी आत्महत्या केली होती. या आकडेवारीत मोठी वाढ झाली असून 8007 पर्यंत पोहोचला आहे. देशभरातील अनेक राज्यांना 2014 आणि 2015 मध्ये सलग दोन वर्ष दुष्काळाचा सामना करावा लागला. महाराष्ट्रातही शेतक-यांनी सलग दोन वर्ष दुष्काळाला तोंड दिलं आहे.
फक्त एकट्या महाराष्ट्रात एकूण 3030 शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. 37.8 टक्के शेतकरी आत्महत्यांसह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.त्यानंतर तेलंगणा दुस-या क्रमांकावर आहे. तेलंगणात 1358 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. तेलंगणामध्ये 1997 शेतक-यांनी आत्महत्या केल्या असून तिस-या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि कर्नाटकमधील एकूण सहा राज्यांमध्ये आत्महत्येची टक्केवारी 94.1 इतकी आहे.
काही राज्यांमध्ये एकाही शेतक-याने आत्महत्या न केल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये बिहार, पश्चिम बंगाल, गोवा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, झारखंड, मिझोरम, नागालँड आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये 2015 मध्ये एकाही शेतक-याने आत्महत्या केलेली नाही.
शेतमजूरांच्या आत्महत्येतही महाराष्ट्रातील आकडा सर्वात जास्त आहे. एकूण 1261 शेतमजूरांनी आत्महत्या केली आहे. यानंतर मध्यप्रदेश 709 आणि तामिळनाडू 604 आत्महत्यांसह दुस-या आणि तिस-या क्रमांकावर आहे. देशभरातील आत्महत्येच्या आकडेवारी दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2014 मध्ये 12,360 जणांनी आत्महत्या केली होती. जो आकडा 2015 मध्ये 12,602 वर पोहोचला आहे.