ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. १५ : अनंत तीर्थांच्या माहेरात कडेवर हात ठेवून उभ्या असलेल्या सावळ्या विठुरायाला "महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा, शेतकरीराजा सुखी व्हावा", राज्यात सगळीकडे उत्साह सुरु आहे तरी उरलेल्या सहा जिल्ह्यातही पाउस पडो असं साकडे मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी घातले आहे. पहाटे पावणेदोनच्या सुमारास देवाला पंचामृताचा अभिषेक झाला. मूर्तीच्या संवर्धनासाठी डोक्यावरून पाण्याने अभिषेक तर पायावर पंचामृताने अभिषेक पार पडला. देवाच्या वस्त्राने अंग पुसून नवे वस्त्र परिधान केल्यावर चंदनाचा टिळा लावून, देवाला आरसा दाखविण्यात आला व विठ्ठलाला भगरीचा नैवेद्य दाखविण्यात आला.
"मी पंढरपूरला जेव्हा येतो तेव्हा मनाला आनंद मिळतो; विठूमाऊली आम्हाला आशीर्वाद देते. ज्या प्रकारची चंद्रभागा संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांनी पाहिली. तशीच निर्मळ, शुद्ध चंद्रभागा सामान्यांना पाहता यावी, असा संकल्प आम्ही यंदा घेतला आहे. आम्हाला हे काम यशस्वीपणे करता येईल असा विश्वास आहे." असेही मुख्यमंत्री म्हणाले.
धो-धो पावसामुळे राज्यातील बहुतेक नद्या दुथडी भरून वाहत असताना सोलापूर जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली आहे़, मात्र लाडक्या विठुमाऊलीच्या दर्शनासाठी वैष्णवांचा चंद्रभागेला पूर आला आहे. पहाटे २: २० मिनिटांनी मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीचे विठुरायाच्या मंदीरात आगमन झालं. आडीच वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत शासकीय महापुजेला सुरुवात झाली. विठ्ठलाची पुजा झाल्यानंतर त्यांनी रुक्मिणी मातेच्या पूजा केली.
मुख्यमंत्र्यासोबत हरिभाऊ व सुनीता पुंधे या दाम्पत्यास यंदाच्या विठ्ठलाची पूजा करण्याचा मान मिळणार. हे दाम्पत्य पाथर्डी येथील असून गेल्या अनेक वर्षापासून सलग वारी करतात. गुरुवारी रात्री ११ वाजता दर्शनाच्या रांगा बंद करण्यात आल्या होत्या त्या मुख्यमंत्र्यांच्या पुजेनंतर खुल्या करण्यात आल्या.
गेले १५-२० दिवस विविध पालख्यांसोबत पायपीट करत वैष्णवांचा दळभार पंढरीकडे वाटचाल करत होता. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत सोपानदेव या प्रमुख पालख्यांसह दिंड्या-दिंड्यांमधून सुमारे चार लाख भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. याशिवाय रेल्वे, बस व खासगी वाहनांनीही वारकरी आले आहेत. जवळपास ९ लाख भाविकांची सध्या पंढरीत दाटी झाली असून, त्यांच्या मुखातून सदा ज्ञानोबा-तुकारामचा जयघोष ऐकायला मिळत आहे.
पंढरपूरात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. पोलीस दिवसरात्र आपली ड्युटी करत आहेत. बंदोबस्तासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील जातीने हजर आहेत.