मुंबई : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती दिनानिमित्त मंगळवारी (२० आॅगस्ट) रोजी ‘जबाब दो- सूत्रदार कौन?’ ही सोशल मीडिया मोहीम आणि ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ ही मोहीम राष्ट्रीय स्तरावर राबविली जाणार आहे.डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाला २० आॅगस्ट, २०१९ रोजी ६ वर्षे पूर्ण होत असून, तपासात अक्षम्य दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र अंनिस सोशल मीडियावर ‘जवाब दो- सूत्रदार कौन?’ ही मोहीम चालविणार असल्याची माहिती अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून समाजाच्या विविध स्तरांतील लोकांनी सरकारला जाब विचारावा, असे अपेक्षित आहे. त्यासाठी २० ते ३१ आॅगस्ट दरम्यान दररोज विविध बाजूंनी जाब विचारणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येणार आहेत.दाभोळकरांच्या खुनाला ६ वर्षे उलटली तरी तपास यंत्रणेला खुनाच्या सूत्रधारांपर्यंत अद्याप पोहोचता आलेले नाही. हे तपास यंत्रणेचे अपयश असले तरी त्यामध्ये ‘राजकीय इच्छाशक्तीचा अभाव’ असल्यामुळे अपयश आले असल्याचे मत अंनिसचे कार्यकर्ते व्यक्त करत आहते.आॅल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क या राष्ट्रीय स्तरावरील समन्वय मंचातर्फे व अंनिस यांच्या संयुक्त विद्यमाने शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा स्मृती दिन (२० आॅगस्ट) यापुढे ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ म्हणून आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यामध्ये आपापल्या ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करणारे उपक्रम हाती घेण्याचे आवाहन अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले आहे.- राज्यातील व देशातील जागृत, संवेदनशील नागरिकांनी आपला नागरिकत्वाचा अधिकार वापरून ‘जबाब दो- सूत्रदार कौन?’ या सोशल मीडिया मोहिमेमध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.- आॅल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे दाभोळकर यांच्या सहाव्या स्मृतिप्रीत्यर्थ २० आॅगस्ट ते २१ सप्टेंबर, २०१९ या कालावधीत राष्ट्रीय प्रबोधन मोहीम हाती घेण्यात येत आहे. या मोहिमेची सुरुवात २० आॅगस्ट रोजी सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत मुंबई मराठी पत्रकार संघ येथील लोकमान्य सभागृहात आयोजित ‘मानवतेच्या विकासासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन’ परिसंवादाद्वारे होणार आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोशल मीडियाद्वारे मोहीम राबविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 3:54 AM