मुंबई - गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील संपूर्ण राजकी वर्तुळाला नारायण राणे पुढे काय राजकीय भूमिका घेतात याची उत्सुकता लागून राहिली होती. अखेर आज दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी राणेंनी आपल्या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली असून, राणेंनी आपल्या नव्या पक्षाचे नाव महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष असे जाहीर केले आहे. नव्या राजकीय पक्षाची घोषणा करताना राणे म्हणाले, "माझा नवा पक्ष राज्यघटनेवर अविचल निष्ठा ठेवून, घटनेच्या चौकटीत राहून राज्याच्या विकासासाठी सनदशीर मार्गाने प्रयत्न करणार. पक्षाचे चिन्ह, झेंडा लवकर घोषित करू. नोंदणीही लवकरच करू. शिवसेना, काँग्रेस तसेच सत्तेतील अनुभवातून राज्याचा विकास करण्यात आमचा पक्ष नक्कीच यशस्वी होईल. सामान्य जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठीच राजकारण करू. दिला शब्द पाळू हेच आमचं ब्रीद वाक्य असेल." यावेळी नारायण राणे यांनी रालोआत जाण्याबाबत मात्र सस्पेन्स कायम ठेवला. "रालोआत जाणार का, याच उत्तर पक्ष स्थापनेनंतर ठरवू. आज दुकान उघडणार असे सांगितले आहे. उघडल्यावर बघू कोण कोण येतो. शिवसेना नंबर एकचा विरोधक असेल. सैनिक नव्हे तर उद्धव यांना विरोध. चांगल्याला चांगल म्हणण्याची नियत त्यांच्यात नाही," असा टोलाही नारायण राणेंनी लगावला. नारायण राणेंनी सुरुवातीलाच शिवसेनेवर जोरदार टीका केली, "दसरा मेळाव्याकडे पत्रकार आणि जनतेच लक्ष होतं. शिवसेना सत्तेत की सत्तेबाहेर अशी चर्चा होती. मी आधीही सांगितले होत की, हाकलल्याशिवाय शिवसेना सत्तेबाहेर पडणार नाही. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान, शरद पवार आदींवर टीका केली. उद्धव यांच कतृत्व काय? नोटाबंदी म्हणजे देशद्रोह म्हणणा-या ठाकरे यांच्या केंद्रातील मंत्र्यांनी लोकसभेत किंवा कॅबिनेटमध्ये साधी नोट अथवा निषेध नोंदविला नाही." नोटाबंदी, महागाई यावरून आंदोलन करणाऱ्या शिवसेनेचे मंत्री अभ्यासपूर्ण मुद्दे कधी मांडतात का, "असा सवालही त्यांनी केला."नोटबंदी, दरवाढ, महागाई, शेतकरी कर्जमाफी आदी विषयात शिवसेनेच्या मंत्री नेत्यांनी कधी अभ्यासपूर्ण मुद्दे मांडले का? कधीच नाही. सत्तेत मंत्रिमंडळात भांडण्याशिवाय कधीच काही केले नाही. लोकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर येतो म्हणता मग सत्तेत का गेलात. महागाई विरोधात ओरड करणाऱ्या मुंबई महापालिकेने प्रचंड कर लावले. त्यामुळे आज लोकांना इथे घर घेता येत नाही. महापालिकेचे कर आणि महागाईवर बोलतात. भ्रष्टाचारविरोधात बोलणारे ठाकरे महापालिकेच्या भ्रष्टाचारावर चकार शब्द काढत नाही. टक्केवारी घेणा-यांना भ्रष्टाचारावर बोलायचा अधिकार नाही. शिवसेनेतील निष्ठावंत, काम करणाऱ्यांना पद, उमेदवारी मिळत नाहीत. पैसे घेऊन तिकटे विकले जातात. हिंमत असेल तर हा आरोप नाकारून दाखवावा." असे आव्हान त्यांनी दिले. यावेळी राणेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा देत उद्धव ठाकरेंना टोला लगावला,"मराठी माणसाने मनाची श्रीमंती ठेवा तर एक दिवस श्रीमंती पाहाल, असे बाळासाहेब एका सभेत म्हणाले. पण उद्धव कुजक्या मनाचा. चांगल त्यांना बघवत नाही. केवळ टीका करतात. पंतप्रधानांवर टीका करण्यासारखं त्यांनी काय केले, सर्वकाही बाळासाहेबांच्या कृपेवर आहे. आयत्या बिळावरचा नागोबा."(लोकमतने 29 सप्टेंबरलाच दिले होते नारायण राणेंच्या स्वाभिमान पक्षाच्या नावाचे वृत्त)
यावेळी राजकीय पक्षाविषयी बोलताना ते म्हणाले, "सत्तेत असेन तर सत्तधारी आणि विरोधात असेन तर विरोधकांचीच भूमिका बजावेन. दोन्ही भूमिका एकाचवेळी बजावणार नाही. मला वाटलं म्हणून पक्ष काढला. सर्वांनी प्रवेशाबाबत बोलणी होत होती. भाजपासोबत जाण्यात शिवसेनॆची अडचण नव्हती. पदासाठी वगैरे पक्ष काढला. काँग्रेसने सीएमचा आश्वासन दिले म्हणून त्यांना विरोध केला."