लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई:शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 10 वी आणि 12 वीच्या निकालाच्या कामकाजासाठी तसेच उद्या 15 जून पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने मुख्याध्यापक, शिक्षक- शिक्षकेतर शालेय कामकाजासाठी उपस्थितीत राहणे आवश्यक आहे. त्यामुळे 10 वी आणि 12 निकाल तयार करण्यासाठी व नवीन वर्षाच्या कामकाजासाठी शिक्षक -शिक्षकेतरांना शाळेपर्यंत पोहचण्यासाठी रेल्वेची परवानगी तातडीने परवानगी द्यावी. तसेच शिक्षक -शिक्षकेतरांचे फ्रँटलाईन वर्कर म्हणून तातडीने लसीकरण कारावे अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष,व अध्यक्ष अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उपाध्यक्ष शिवाजी शेंडगे यांनी सदर मागणी मुख्यमंत्र्यांकडे ई मेल व पत्राद्वारे केली आहे. त्याला मुख्यमंत्री कार्यालयातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून पुढील कार्यवाहीसाठी शिक्षण विभाग व मदत आणि पुनर्वसन विभागाशी संपर्क साधण्यात आला आहे अशी माहिती शिवाजी शेडगे व मुंबई उपाध्यक्ष राज बोराटे यांनी दिली.