मुंबई : वाढत जाणाऱ्या वाहनसंख्येमुळे अपघातही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची बाब समोर आली आहे. २०१६ मध्ये झालेल्या रस्ते अपघातांमध्ये तब्बल १२ हजार ८८३ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. देशभरात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागत असून पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे तामिळनाडू व उत्तरप्रदेश हे राज्य असल्याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली. हे पाहता रस्ते अपघात कमी करण्यासाठी परिवहन विभागाकडून प्रयत्न केले जात असून त्याचाच एक भाग म्हणून एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. २१ मार्च रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कार्यशाळा आयोजित केल्याची माहिती देण्यात आली. २0१६ मध्ये ३९ हजार ८४८ अपघातांमध्ये १२ हजार ८८३ जण मृत्यूमुखी पडले आहेत. तर ३५ हजार ८९४ जण जखमी झाले. या अपघातांमध्ये १५ ते ४९ वयोगटाचा सर्वात जास्त समावेश असल्याचे सांगण्यात आले. रस्ते अपघातांमधील साधनसंपत्ती व जिवितहानी कमी करण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघाने २0२0 सालापर्यंत विकसनशील देशांमध्ये एकूण अपघातसंख्या ५0 टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याच धर्तीवर रस्ते अपघात कमी करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विभाग व महाराष्ट्र परिवहन विभाग यांच्या संयुक्तपणे प्रयत्न करत असून मंगळवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
रस्ते अपघातांत महाराष्ट्र तिसरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2017 3:23 AM