पुणे/नागपूर/सोलापूर : देशभरात आलेल्या उष्णतेच्या लाटेत महाराष्ट्रही होरपळून निघाला आहे. खान्देशात उष्माघाताने एकाचा बळी घेतला. विदर्भातील तापमान ४४ अंशांच्या वर गेले असून तेथे दुपारी अघोषित संचारबंदी लागल्यासारखे चित्र पाहायला मिळत आहे. मराठवाडा, खान्देशाबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातही झळा तीव्र झाल्या आहेत. बहुतांश शहरांतील तापमान ४० अंशांपुढे असून सोलापुरातील पारा ४३ अंशांवर गेला आहे. पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.विदर्भ, मराठवाड्यात शुक्रवारी तुलनेने उन्हाची तीव्रता जास्त होती. वर्धा येथे राज्यातील सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात हंगामात पहिल्यांदाच पारा ४५ वर गेला आहे. नागपुरात शुक्रवार यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वांत उष्ण दिवस ठरला. विदर्भात अकोला, चंद्रपूर, नागपूर या शहरांचे तापमान ४४ अंशांच्या पुढे होते. तर अमरावती, बुलडाणा, यवतमाळ या शहरांतील तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंशांच्या दरम्यान राहिला. एप्रिलमध्ये विदर्भातील तापमान ४४.५ अंशांपर्यंत वर चढते. परंतु यंदा तो विक्रम मोडून तापमान ४५ अंशांच्या वर जाण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.मराठवाड्यातही परभणीचे तापमान ४४ अंशांच्या पुढे गेले. मध्य महाराष्ट्रालाही उन्हाचा तडाखा बसत असून शुक्रवारी मालेगाव येथे वर्ध्यापाठोपाठ ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जळगावचा पाराही ४३ अंशांच्या पुढे होता.पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र तापमानाने चाळिशी पार केली असून तीव्र झळांनी दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट होता. थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमधील तापमानही सरासरीपेक्षा ४.७ अंशाने अधिक होते. सोलापूरचा पारा ४३ अंशाच्या पुढे तर पुण्यासह अहमदनगर, कोल्हापूर, नाशिक, सांगली, सातारा येथील तापमान ४० ते ४२ अंशांच्या दरम्यान होते. मुंबईसह रत्नागिरी, अलिबाग, डहाणू या भागात तापमान सरासरीच्या जवळपास राहिले. सोलापुरात शुक्रवारी यंदाच्या वर्षातील सर्वोच्च ४३.७ अं. से. तापमानाची नोंद झाली. मार्चमध्ये काही दिवस पाऱ्याने चाळिशी पार केली होती. एप्रिलमध्ये तापमानात सातत्याने वाढ होत आहे. १२ एप्रिल रोजी ४२.६ अं. से. तापमान नोंदले गेले. गुरुवारी त्यात वाढ झाली. शुक्रवारी तर पारा ४३़७ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने नागरिक हैराण झाले आहेत़ (लोकमत न्यूज नेटवर्क) उष्माघाताचा पहिला बळीजळगाव : कंडारी (ता. भुसावळ) येथील शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख यशवंत रामा चौधरी (४७, रा.भादली) यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय आहे़ ही घटना गुरुवारी भरदुपारी दीडच्या सुमारास घडली. खान्देशात हा उष्माघाताचा पहिला बळी ठरला आहे. कामानिमित्त बाहेर पडलेल्या चौधरी यांना अवस्थ वाटू लागले़ त्यानंतर ते झोपले आणि झोपेतच त्यांना रक्ताची उलटी होऊन त्यांचा मृत्यू झाला़, अशी माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली. प्रमुख शहरांतील तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)मुंबई ३२, पुणे ४१.५, अहमदनगर ४१.७, जळगाव ४३.६, कोल्हापूर ४०.६, महाबळेश्वर ३६.४, मालेगाव ४४.८, नाशिक ३९.९, सांगली ४२.६, सातारा ४०.८, सोलापूर ४३.७, रत्नागिरी ३३.१, अलिबाग ३२.१, उस्मानाबाद ४२, परभणी ४४, अकोला ४४.४, अमरावती ४३.२, बुलडाणा ४२.२, चंद्रपूर ४४.६, गोंदिया ४१.८, नागपूर ४४.२, वाशिम ३९.२, यवतमाळ ४३.
महाराष्ट्रही होरपळला!
By admin | Published: April 16, 2016 2:34 AM