मुंबई - देशातील एकूण परकीय गुंतवणुकीची एप्रिल ते जून २०२४ या पहिल्या तिमाहीची आकडेवारी समोर आली असून, देशात झालेल्या एकूण गुंतवणुकीपैकी तब्बल ५२.४६ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. राज्याने परकीय गुंतवणुकीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
फडणवीस म्हणाले की, राज्यात २०१४ ते २०१९ या काळात सत्तेत असताना एकूण ३.६ लाख कोटी रुपयांची परकीय गुंतवणूकमहाराष्ट्रात आली होती. आता सव्वा दोन वर्षांत ३.१४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक सरकारने राज्यात आणली. दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी अजून बाकी असल्याने एकूण गुंतवणुकीचा आकडा आणखी वाढणार आहे.
दुसऱ्या क्रमांकाचे कर्नाटक राज्य महाराष्ट्राच्या जवळपासही नाही, गुजरात पाचवे कर्नाटक, दिल्ली, तेलंगणा, गुजरात, तामिळनाडू, हरयाणा, उत्तर प्रदेश व राजस्थान या राज्यांमध्ये झालेल्या गुंतवणुकीच्या एकत्रित बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात झाली आहे.
गुंतवणूक केवळ कागदावर आहे. महाराष्ट्रातून गुजरात व भाजपशासित राज्यात उद्योग गेले. महाराष्ट्रापेक्षा गुजरात पुढे गेला आहे. हे ते का सांगत नाहीत? - विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा
वडेट्टीवार यांना गुजरातचे गुणगान गाण्यात अधिक रस दिसतो. आपले राज्य पहिल्या क्रमांकावर आल्यानंतरही त्यांना कौतुक नाही. हा महाराष्ट्रद्रोह नाही तर आणखी काय आहे? - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री.