भीमगोंडा देसाई ल्ल कोल्हापूरराष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे झालेल्या राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत महाराष्ट्राने या वर्षीही देशात पहिला क्रमांक मिळविला. गेली २७ वर्षे महाराष्ट्र राज्य देशात अव्वल राहिले आहे. यंदा राज्यातील ११२ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. त्यात ९९ मुले आणि १३ मुली आहेत.मूलभूत क्षमतांचा विकास व्हावा आणि प्रज्ञावान विद्यार्थ्यांना शिक्षणास प्रोत्साहन मिळावे यासाठी दरवर्षी नोव्हेंबरमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा घेतली जाते. त्यातील पात्र विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते. सामान्य विज्ञान, समाजशास्त्र, (इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र), गणित, भूमिती यांसह सामान्य बौद्धिक क्षमता कसोटीवर परीक्षा होते. पात्र विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी दरमहा ५०० रुपये शिष्यवृत्ती, तर पीएच.डी. केल्यास चार वर्षे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार आर्थिक मदत मिळते. राज्यात मराठी माध्यमाचे २२ आणि इंग्रजी माध्यमाचे ९०, तर राज्य शासनाचा अभ्यासक्रम शिकत असलेले ५६, ‘सीबीएसई’चे ५३, ‘आयसीएसई’चे ३ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. पात्र विद्यार्थ्यांमध्ये सर्वसाधारण ९९, अनुसूचित जातींचे १०, अनुसूचित जमातींचे २ आणि १ अपंग परीक्षार्थी आहे.सांगली, सिंधुदुर्ग, नंदुरबार, जालना, अमरावती, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, उस्मानाबाद जिल्ह्यांतील एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरलेला नाही.सातारा, रत्नागिरी, मुंबई (दक्षिण), अहमदनगर, नाशिक, धुळे, वाशिम, यवतमाळ, लातूर, परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी १. जळगाव : ६, मुंबई (पश्चिम) : १०, मुंंबई (उत्तर) : ९, रायगड : ३, ठाणे : २०, पुणे : १२, सोलापूर : २, औरंगाबाद : १८, बीड : ५, बुलढाणा : २, अकोला : ७, नागपूर : २, गोंदिया : २, नांदेड : २ या जिल्ह्यांनीही यश मिळवले.
‘राष्ट्रीय प्रज्ञा शोध’मध्ये महाराष्ट्र सलग २७ वर्षे देशात अव्वल
By admin | Published: March 04, 2015 2:27 AM