नवी दिल्ली : अनुसूचित जातीच्या (एससी) उद्योजकांना अर्थसाह्य देणाऱ्या ‘व्हेंचर कॅपिटल फंड स्कीम’ या योजनेअंतर्गत गेल्या दोन वर्षांत १७ राज्यातील ६४ उद्योजकांना लाभ मिळाला आहे. २२ लाभधारकांसह महाराष्ट्र त्यात अव्वल ठरला आहे. अनुसूचित जातींच्या उद्योजकांना अर्थसाह्य करण्यासाठी भारत सरकारने ‘क्रेडिट एनहान्समेंट गॅरंटी स्कीम’ या नावाने योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या उद्योजकांना अर्थसाह्य देण्यासाठी सरकार बँका आणि वित्तीय संस्थांना साह्य करते. याशिवाय ‘स्टँड-अप इंडिया स्कीम’ या योजनेअंतर्गत एससी/एसटी आणि महिलांमध्ये उद्योजकता वाढीस लागावी यासाठी प्रोत्साहन दिले जाते. एससी/एसटी हब अंतर्गत अनुसूचित आणि जमातीच्या उद्योजकांना सार्वजनिक वितरण प्रणालीत सहभागी करून घेतले जाते. राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळही विविध प्रकारच्या योजना या जातींतील उद्योजकांसाठी राबवित असते. (लोकमत न्यूज नेटवर्क )
एससी उद्योजकांच्या यादीत महाराष्ट्र अव्वल
By admin | Published: March 15, 2017 12:47 AM