शिवाजी गोरे-- दापोली--जागतिक मृदा दिनी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका वाटप करण्यात येत आहे. यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर असून, १२ लाख शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका वाटप करण्यात येणार आहे. त्या पाठोपाठ आंध्रप्रदेशातील ८ लाख तसेच तामिळनाडूतील ७ लाख शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकेचे वाटप केले जाणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी उद्योगाला गती देण्यासाठी शाश्वत शेतीचा मार्ग स्वीकारला असून, यासाठीच केंद्र व राज्य शासनाच्या सहयोगाने राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत मृदा आरोग्य पत्रिका ही योजना सन २०१५ - १६ पासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत देशातील विविध राज्यातील शेतीचे माती परीक्षण करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि दापोली कोकण कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दापोली तालुक्यातील साखरोली येथे जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून मृदा आरोग्य पत्रिकेचे शनिवारी वाटप करण्यात आले. यावेळी कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य उपस्थित होते. त्यांच्यासमवेत संशोधन संचालक डॉ. उत्तम महाडकर, सहयोगी अधिष्ठाता सुभाष चव्हाण, विभागप्रमुख डॉ. प्रमोद सावंत, उपविभागीय कृषी अधिकारी जांबुवंत घोडके, तालुका कृषी अधिकारी मुरलीधर नागदिवे, अनिल दुसाणे, राजेश धोपावकर, डॉ. भैरमकर आदी उपस्थित होते.मृदा आरोग्य पत्रिका वितरण अभियानांतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना येत्या ३ वर्षात त्यांच्या जमिनीची मृदा आरोग्य पत्रिका उपलब्ध करुन देण्यात येणार असून, हा कार्यक्रम सन २०१५ - १६ ते २०१७ - १८ या तीन वर्षाच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. जमीन आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनीची रासायनिक गुणधर्म स्थिती, प्रमुख अन्नद्रव्याची पातळी व सूक्ष्म मूलद्रव्य कमतरता स्थितीची माहिती जमीन आरोग्य पत्रिकेतील अहवालानुसार पिकांना खत मात्रेची शिफारस शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. यासाठी राज्यामध्ये मृदा चाचणी तपासणीसाठी शासकीय २९ व नोंदणीकृत अशासकीय १३१ अशा एकूण १६० मृदा चाचणी प्रयोगशाळा आहेत.कृषी पद्धतीत रासायनिक खतांचा वापर त्याचबरोबर पाण्याच्या अर्निबंधीत वापरामुळे तसेच तद्नुषंगीक कारणांमुळे जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे. त्याचा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ लागल्याने मृदा आरोग्य अबाधित राखण्यासाठी मृदा तपासणीवर आधारीत खतांच्या संतुलीत तसेच परिणामकारक वापराला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनाच्या सहयोगाने मृदा आरोग्य पत्रिका ही योजना सन २०१५ - १६ पासून राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील १ कोटी ३७ लाख शेतकऱ्यांच्या शेत जमिनीची माती परिक्षणातून मृदा आरोग्य पत्रिका तयार केली जाणार आहे. यामध्ये लागवडीखालील क्षेत्रामधून जिरायत क्षेत्रासाठी १० हेक्टर क्षेत्राला १ मृदा नमुना व बागायती क्षेत्रासाठी २.५ हेक्टर क्षेत्राला १ मृदा नमुना घेऊन त्यांचे प्रमुख व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे विश्लेषण करण्यात येत आहे.रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर कमी करुन मृदा तपासणीवर आधारीत, अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार खतांच्या संतुलीत व कार्यक्षम वापराला प्रोत्साहन देणे.मृदा आरोग्य सुधारण्यासाठी तसेच मुलद्रव्यांची परिणामकारकता वाढविण्यासाठी जैविक खते, सेंद्रीय खते, गांडुळ खत, निंबोळी सल्फर आच्छादीत युरियासारख्या संथगतीने नत्र पुरवठा करणाऱ्या खतांच्या वापराला प्रोत्साहन देणे.एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाद्वारे पिकांच्या उत्पादकतेत वाढ करणे.जमिनीच्या उत्पादकतेविषयीच्या समस्या जाणून घेऊन त्यावर खतांच्या शिफारशी विकसीत करणे.मृदा तपासणीवर खतांच्या संतुलित वापराला महत्व.जमिनीचे आरोग्य बिघडल्याने भविष्यातील धोका लक्षात आल्याने संयुक्त राष्ट्राच्या ६८ व्या सर्वसाधारण सभेत ‘२०१५ आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष’ म्हणून घोषीत करण्यात आले. जमिनीच्या आरोग्याबाबत संपूर्ण जगात याबाबतचा संदेश पोहचविणे तसेच शेतकरी व समाजात जाणीव व जागृती करुन देण्याच्या मुख्य हेतूने ५ डिसेंबर ‘जागतिक मृदा दिवस’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने एकाच दिवशी राज्यातील १२ लाख शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका देण्यात येत आहेत.
महाराष्ट्र देशात अव्वल, आंध्र दुसरे
By admin | Published: December 06, 2015 11:09 PM