मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कडक निर्बंध लावण्यात आले होते. मात्र निर्बंध शिथील करण्याची मागणी लोकांकडून होत होती. त्यामुळे पुढील आठवड्यापासून टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रात निर्बंध शिथील करण्यात येणार आहे. टास्कफोर्सनं याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना(CM Uddhav Thackeray) अहवाल सादर केला. या आठवड्यात टास्क फोर्स सदस्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. त्यात अहवालावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
अनलॉकच्या टप्प्यात लोकल सेवा(Mumbai Local) सुरू करण्याबाबत लगेच निर्णय घेण्यात येणार नाही. त्यामुळे लोकल सेवेसाठी आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागेल.
कसं असेल ‘ऑपनिंग अप’?
टप्प्याटप्प्याने सर्व आस्थापना सुरू होणार
लसीकरण पूर्ण झालेल्यांना प्राधान्य
हॉटेल, रेस्टॉरंटला रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी मिळेल
दुकानांमधील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण गरजेचे
सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाचा निर्णय अद्याप नाही
राज्य सरकारने पहिल्या लाटेनंतर पुनश्च: हरिओमचा नारा दिला. त्यानंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ब्रेक द चेन म्हणत राज्य सरकारने निर्बंध लावले होते. आता ‘ओपनिंग अप’चा नारा देऊन राज्य सरकार निर्बंध हटवण्याची तयारी करत आहे. कोणते निर्बंध हटवले जावेत? कुठल्या निर्बंधता शिथिलता आणावी? कार्यालयात किती कर्मचारी असावेत? याबाबतचा अहवाल टास्क फोर्सनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सादर केला आहे.
येत्या आठवड्यात मुख्यमंत्री आणि टास्क फोर्सच्या(Task Force) सदस्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत ‘ओपनिंग अप’बाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. पहिल्या टप्प्यात दुकानं, हॉटेल, रेस्टॉरंट आणि कार्यालयं सुरू करण्याचा विचार आहे. त्यातही ज्या लोकांचं लसीकरण पूर्ण झालं त्यांना ‘ओपनिंग अप’मध्ये प्राधान्य दिलं जाईल. यावर सध्या विचार सुरू आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय बाकी आहे. त्यानंतर राज्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने हटवले जातील अशी माहिती देण्यात आली आहे. मात्र सर्वसामान्यांना ज्या लोकल प्रवासाची आशा लागली आहे त्याबाबत तुर्तास निर्णय घेण्यात येणार नाही अशी माहिती आहे.
बऱ्याच राज्यांची अनलॉकच्या दिशेने वाटचाल
उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश सारख्या राज्यांनी बऱ्याच गोष्टी अनलॉक केल्या आहेत. कोरोनाची रौद्र झालेली दुसरी लाट ओसरू लागल्याने विविध राज्यांनी अनलॉक करण्याचा वेग वाढविला आहे. सोमवारपासून ही राज्ये प्रतिबंध ढीले करू लागली आहेत. केंद्राने तरीदेखील राज्यांना आवश्यक सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. उत्तर प्रदेशमध्ये नाईट कर्फ्यूचा वेळ बदलण्यात आला आहे. उद्यापासून हा वेळ रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत असणार आहे. आधी तो सायंकाळी ७ ते सकाळी ७ असा होता. कंटेनमेंट झोनच्या बाहेरील बाजारपेठा उघडण्यात येणार आहेत. राजस्थानमध्ये विकेंड कर्फ्यू हटविण्यात आला आहे. सिनेमागृहे, ट्रेनिंग सेंटर्स, पर्यटन स्थळे, लग्न समारंभ आदींना परवानगी देण्यात आली आहे. राज्या बाहेरील पर्यटकांनी लसीचा एक डोस घेतला असेल तर त्यांना बिनदिक्कत फिरता येणार आहे. पंजाब सरकारने देखील विकेंड बॅन आणि नाईट कर्फ्यू हटविला आहे. घरगुती कार्यक्रमांना 100 लोक आणि बाहेर कार्यक्रमांना 200 लोक एकत्र येऊ शकतात. लस घेतलेल्यांना बार, रेस्टॉरंट, स्पा, स्विमिंग पुल, मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
दिल्ली सरकारने शाळा उघडण्याची तयारी सुरु केली आहे. सोमवारपासून शाळांच्या ऑडिटोरिअम किंवा असेम्ब्ली हॉलमध्ये ट्रेनिंगसाठी उघडता येणार आहेत. सध्या विद्यार्थी येऊ शकणार नाहीत. सिनेमा गृहे उघडणार नाहीत. मेट्रो, बसमध्ये ५० टक्के प्रवासी असतील. कर्नाटकात अनलॉकसाठी सार्वजनिक बस, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मेट्रो सुरु करण्यात आली आहे. पाँडिचेरीमध्ये १६ जुलैपासून ९ ते १२ वीच्या शाळा उघडणार आहेत. कॉलेजदेखील सुरु होणार आहेत.