कोरोनाचे संकट (Corona) अद्याप गेलेले नाही. कोरोनाच्या लाटा येत-जात आहेत. कोरोनाची दहशत आपल्याला उलथवून टाकली पाहिजे. काही जिल्ह्यांमध्ये आणखी काळजी घेण्याची गरज आहे. राज्यातील निर्बंध पुढील 8-10 दिवसांत शिथिल करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackreay) यांनी केली. (Uddhav Thackreay announce Relaxation in lockdown.)
सोशल मीडियावरून नागरिकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, या वर्षी पावसाची सुरुवातच चक्रीवादळाने झाली. त्यामुळे राज्यभरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महापुराच्या काळात प्रशासनाने चांगलं काम केले. पुरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही. लसीकरण काही टप्प्यांपर्यंत पूर्ण होत नाही तोवर कोरोनाचे नियम आपल्याला पाळावे लागणार आहेत. राज्यातील काही भागात कोरोना आटोक्यात आहे. मात्र, काही ठिकाणी अद्याप परिस्थिती आटोक्यात आलेली नाही. यामध्ये पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. यंदा सण उत्सव तोंडावर आहेत. ही सारी परिस्थिती पाहून निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
काहींनी मंदिरे, हॉटेल, मॉल्स उघडण्याची मागणी केली. याबाबतचा निर्णय येत्या 8 दिवसांत घेण्यात येईल. उद्या टास्क फोर्सची बैठक होत आहे. त्यामध्ये आढावा घेऊन त्यांच्या सल्लामसलतीनंतर मंदिरे, मॉल उघडण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. गर्दी टाळा, गर्दी झाल्यानं रुग्णवाढ होते, असा सल्ला ठाकरे यांनी दिला.