महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेसने प्रज्ञा राजीव सातव यांना उमेदवारी दिली आहे. प्रज्ञा सातव ह्या काँग्रेसच्या विधान परिषदेतील विद्यमान आमदार आहेत.
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीमध्ये विधानसभेतील आमदार हे उमेदवार निवडून देणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत विधानसभेतील संख्याबळ हे निर्णायक ठरणार आहे. सद्यस्थितीत विधानसभेमध्ये काँग्रेसचे ३७ आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेसचा एक आमदार निवडून येऊ शकतो. त्यानंतर काँग्रेसकडे काही मतांचा कोटा शिल्लक राहणार आहे. हा कोटा काँग्रेसकडून मित्रपक्षांकडे वळवला जाऊ शकतो.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाने पंकजा मुंडे यांच्यासह एकूण पाच जणांना भाजपानं उमेदवारी जाहीर केली आहे. पंकजा मुंडे यांच्यासह परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना भाजपानं उमेदवारी दिलीआहे. विधान परिषदेचे हे आमदार विधान परिषद सदस्यांमार्फत निवडले जाणार आहेत. त्यामध्ये महायुतीचं संख्याबळ पाहता भाजपाचे ५ उमेदवार विजयी होऊ शकतात. त्यानुसार भाजपानं पाच जणांना आपल्याकडून संधी दिली आहे.