राज्यातील विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान सुरू आहे. विधानसभेतील आमदारांकडून निवडून दिल्या जाणाऱ्या या ११ जागांसाठी एकूण १२ उमेदवार रिंगणात उतरल्याने ही निवडणूक होत आहे. त्यामध्ये राज्यातील सत्ताधारी महायुतीने ९ तर विरोधी पक्षामधील महाविकास आघाडीने ३ उमेदवार दिले आहे. त्यामुळे पराभूत होणारा बारावा उमेदवारा कोण असेल, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विधान परिषद निवडणुकीत पराभूत होणाऱ्या उमेदावाराबाबत सूचक विधान केलं आहे. ( Maharashtra MlC Election Result 2024)
विधान परिषदेचं मतदान सुरू असतानाचा सुषमा अंधारे यांनी ‘गर्जे’ल तो पडेल का? असं ट्विट केलं आहे. तसेच या ट्विटला खेला होबे असा हॅशटॅगही दिला आहे. या ट्विटमधून सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दुसरे उमेदवार शिवाजीराव गर्जे यांच्या पराभवाचे संकेत दिलेला आहेत का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर अजित पवार गटात अस्वस्थता असून अनेक आमदार हे शरद पवार यांच्याकडे परतण्यास उत्सुक आहेत. त्या पार्श्वभीमीवर कुंपणावर असलेले हे आमदार विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला साथ देतील, असे दावे केले जात आहेत. त्यामुळे अजितदादांसोबत असलेल्या आमदारांची मतं फुटून अजित पवार गटाचा दुसरा उमेदवार पराभूत होईल, असं बोललं जात आहे. आता त्याच पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी केलेल्या ट्विटमुळे अजित पवार गटाची धाकधुक वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी महायुतीकडून भाजपाने पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेना शिंदे गटाने भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना तसेच अजित पवार गटाने राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शेकापचे जयंत पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे.