Maharashtra Vidhan Parishad Election Result 2024: राज्यात विधान परिषदेची आज निवडणूक झाली. विधान परिषदेच्या ११ रिक्त जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात होते. महायुतीने ९ तर महाविकास आघाडीने ३ उमेदवार दिले. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी ( Maharashtra MLC Election Result 2024 ) गुप्त पद्धतीने मतदान झाले आणि त्यात महायुतीचे ९ उमेदवार विजयी झाले. भाजपाचे ४, शिंदेंच्या शिवसेनेचे २ आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे २ उमेदवार पहिल्याच फेरीत निवडून आले. तर भाजपाच्या पाठिंब्याचे उमेदवार सदाभाऊ खोत यांनी दुसऱ्या पसंतीची अधिक मते घेऊन विजय मिळवला. महाविकास आघाडीतून काँग्रेसच्या प्रज्ञा सातव सहज विजयी झाल्या. पण ठाकरेंच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांच्यातील एका उमेदवाराला फटका बसणे अपेक्षित होते. त्यानुसार मिलिंद नार्वेकर जिंकले आणि शेकापचे जयंत पाटील पराभूत झाले. याच मुद्द्यावर बोलताना, भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांनी मविआवर तोंडसुख घेतले.
"लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर मविआला इतका अहंकार आलाय की 'हम करे सो कायदा' अशी वागणूक आहे. लोकसभा निवडणुकीत एक नरेटिव्ह सेट करून झालं, आता चातुवर्णीयांचे नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न सुरु आहे. स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी जाती-जातीमध्ये विष कालवण्याचे काम मविआ करत आहे. समाजात तेढ निर्माण करायचा प्रयत्न कसा सुरु आहे हे या विधिमंडळाने पाहिलं आहे. पण नेहमी खोटेपणा जिंकत नाही. ससा आणि कासवाच्या शर्यतीत एकदा कासव जिंकलं म्हणून कासवाने असा आव आणायचा की त्याची गती सशापेक्षा जास्त आहे हे हास्यास्पद आहे," अशा शब्दांत सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांनी पाठिंबा दिलेल्या शेकापच्या जयंत पाटलांच्या पराभवावर भाष्य केले.
"रामदास आठवले यांच्याशी भाजपाचे चांगले संबंध आहेत. त्यांचा लोकसभेत एकही खासदार नाही पण त्यांना मंत्री केलेले आहे. कारण मैत्री ही टिकवावी लागते. स्वार्थ बाजूला ठेवून स्नेह वाढवावा लागतो. मविआच्या नेत्यांना स्वत:शिवाय दुसरं काहीच दिसत नाही. आमच्यासोबत असताना आमचा धोका दिला, जनादेशाचा अवमान केला, जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला, आता पुन्हा तेच झालं. जयंत पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ आमदारांना आधी उमेदवारी दिली. शरद पवार यांनी त्यांना पाठिंबा दिला. नंतर उद्धव ठाकरेंनी स्वत:चा उमेदवार म्हणून मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी दिली आणि मविआ मध्ये पुन्हा धोका केला," अशी खरमरीत टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.