Maharashtra Vidhan Parishad Election: राज्याच्या विधान परिषदेच्या दहा जागांची आज निवडणूक होत आहे. दहावी जागा महाविकास आघाडीच्या खात्यात जाणार की, भाजपच्या हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, आज सकाळपासूनच सत्ताधारी आणि विरोधी नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज सरकारवर जोरदार निशाणा साधला.
'कोणी कितीही पावसात भिजा...'विधान भवनाच्या आवारात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना पडळकर यांनी आजच्या मतदानावर भाष्य केले. तसेच, यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "कोणी कितीही पावसात भिजले, तरी त्याचा परिणाम होईल असं आज वाटत नाही. भारतीय जनता पक्ष लोकशाहीवर विश्वास ठेवणारा आहे. 2019ला राज्यातील जनतेने भाजप-सेना युतीचे 161 आमदार निवडून दिले होते. पण, विश्वासघात झाला. पाठीत खंजीर खुपसून यांनी सरकार स्थापन केले. पण, आता आमदारांना आपले मत व्यक्त करण्याची संधी मिळाली आहे," अस पडळकर म्हणाले.
विधान परिषदेची कोणाला उमेदवारी?शिवसेनेकडून सचिन अहीर, आमशा पाडवी रिंगणात आहेत. तर भाजपाकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उपा खापरे आणि प्रसाद लाड असे पाच उमेदवार निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना तिकीट दिले आहे. तर काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप आपले नशिब आजमावत आहेत.