भाजपाने राज्यसभेवेळी गिरविलेला कित्ता पुन्हा विधानसभेला गिरविण्यात आला आहे. राज्यसभेवेळी भाजपाने मविआच्या मतांवर आक्षेप घेतला होता. यामुळे निकाल रात्री उशिराने जाहीर झाला होता. आता काँग्रेसने भाजपाच्या दोन्ही आजारी आमदारांच्या मतदान प्रक्रियेवरून आक्षेप घेतला आहे.
यावेळचे मतदान हे गुप्त पद्धतीने होते. राज्यसभेचे मतदान हे वेगळ्या पद्धतीचे होते. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काँग्रेसकडूनभाजपाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या मतदानावर आक्षेप घेण्यात आला. तशी तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली. यावर केंद्रीय निवडणूक आयोगाची दिल्लीत बैठक सुरु झाली आहे. याच्या निर्णयानंतर मतमोजणी सुरु होईल.
नक्की काय आहे आक्षेप?विधान परिषदेची मतदान प्रक्रिया ही गुप्त मतदान पद्धतीची असते. अशा प्रक्रियेमध्ये आपण मतदान केल्यानंतर ती मतपत्रिका स्वत: फोल्ड करून मतपेटीत स्वत:च्या हाताने टाकायची असते. पण हे दोनही आमदार कर्करोगाशी झुंज देत असल्यामुळे त्यांना मतदानासाठी व्हीलचेअर वरून आणण्यात आले होते. अशा परिस्थितीत त्यांनी मतदान करून झाल्यावर ही मतपत्रिका थेट मतपेटीत टाकणे शक्य नसल्याने सहकाऱ्यांना दिली आणि त्यांनी ती मतपत्रिका मतपेटीत टाकली. त्यामुळे अशा प्रकारे दुसऱ्याला मतपत्रिका देण्याबाबत भाजपाने आधीच निवडणूक आयोगाकडून परवानगीही घेतली होती का? तसे नसेल तर या नियमाचा भंग होतो अशा आशयाचा आक्षेप काँग्रेसकडून घेण्यात आला आहे.
यामुळे विधान परिषदेची मतमोजणी दुपारी पाच वाजता सुरु होणार होती, त्यास विलंब होणार आहे. यामुळे दहा जागांचा निकालदेखील उशिराने लागण्याची शक्यता आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी, काँग्रेसने यावर आक्षेप घेतला आहे. त्यांनाच याचे कारण माहिती आहे. निवडणूक अधिकारी यावर निर्णय देण्यास सक्षम आहेत, असे सांगितले.
राज्यसभेला त्यांनी मतदान केले होते. विधान परिषदेत त्यांच्यामार्फत प्रतिनिधींकडून मतदान करण्यात आले. भाजपाने इतक्या त्रासातून त्यांना मतदानासाठी आणायला नव्हतं पाहिजे. त्यामुळे भाजपानं सहानुभूती दाखवायला हवी होती असं काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.
या दोन्ही आमदारांच्या वतीने दुसऱ्या माणसाने मतदान केले. हे दोन्ही आमदार सही करू शकत होते मग मतदानाला दुसऱ्याला का पाठवले? यावर निवडणूक अधिकाऱ्यांकडे आक्षेप घेतला आहे. त्यांच्यावर निर्णय होईल असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.