आज महायुतीसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आमचे सर्वच्या सर्व ९ उमेदवार निवडून आले आहेत. मुख्यममंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमच्या महायुतीने जेव्हा ९ उमेदवार लढवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा अनेक लोक वल्गना करत होते आणि आमचे उमेदवार पडतील, महा विकास आघाडीचे उमेदवार येतील, असे सांगित होते. मात्र आज आपल्याला बघायला मिळत आहे की, आम्हाला आमची मते तर मिळालीच, पण महाविकास आघाडीची मते देखील आमच्याकडे आलेली आहेत. त्यामुळे एक चांगला विजय आम्हाला मिळाला आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी महायुतीच्या निवडून आलेल्या सर्व सदस्यांचे अभिनंदनही केले.
फडणवीस म्हणाले, "आमच्या राष्ट्रीय सचिव पंकजा ताई देखील आज निवडून आल्या आहेत. आमचे सर्व निवडून आलेले उमेदवार बघितले तर, सर्वसामान्य घरातील, सर्व समाजातील आणि सामान्य माणसांत काम करणारे अशा प्रकारचे आमचे उमेदवार आहेत. मी सर्व मतदारांचे आभार मानतो. ज्यांनी आमच्या महायुतीवर प्रचंड विश्वास दाखवला आणि आमच्या सर्व उमेदवारांना निवडून दिले."
"मला विश्वास आहे की, ही जी सुरुवात झाली आहे, विधानसभेच्या निवडणुकीतही मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा आमची महायुती निवडूनयेईल, असा विश्वास मी व्यक्त करतो," असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
सदाभाऊ खोत यांचा मोठा विजय - "सदाभाऊ खोत हा जनतेचा माणूस आहे, शेतकऱ्यांचा नेता आहे. जनतेसाठी २४ तास राबणारा नेता आहे, त्यामुळे निश्चितपणे आमच्या महायुतीच्या आमदारांनी तर त्यांच्यावर विश्वास दाखवलाच, पण इतरही आमदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांच्या एकूण मतांची बेहीज बघितली तर त्यांना २६.५ मते मिळाली आहेत. त्यामुळे एक मोठा विजय त्यांना मिळाला आहे," असेही फडणवीस म्हणाले.