विधान परिषद मतदानाची वेळ संपत आलेली असताना विधान भवनात जे काही चाललेय त्याची आतही आणि बाहेरही जोरदार चर्चा सुरु आहे. भाजपाचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात जात भेट घेतली. तेव्हा तिथे राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे देखील उपस्थित होते. नेमक्या याचवेळी बाहेर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आणि काँग्रेसच्या तीन नेत्यांची भेट झाली.
फडणवीस त्यांच्या आमदारांसह सदनाबाहेर पडले होते, तेवढ्यात समोरून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, बंटी पाटील हे येत होते. फडणवीसांसोबत भाजपाचे उमेदवार प्रशांत बंब, प्रवीण दरेकर देखील होते. यामुळे लगेचच फडणवीसांनी हात जोडत मतदान करायला तीन मतदार येणार आहेत म्हणे असे म्हटले. यावर एकच हशा पिकला.
यावर सतेज पाटलांनी लगेचच फडणवीसांना प्रत्यूत्तर देत बाजु सावरली. मी नाही येणार, असे म्हटले. त्यावर फडणवीसांनी पाटलांच्या दंडावर हात ठेवून अरे हा नाही येणार, असे म्हटले. विधान भवनात निवडणुकीवरून तणावाचे वातावरण असले तरी शिवसेना वगळता सर्व पक्षांत खेळीमेळीचे वातावरण असल्याचे दिसले.
मतदानाची मुदत संपण्यासाठी दोन तास शिल्लक राहिले आहेत. दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करण्यास देण्यासाठी सुनावणी सुरु आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.