Maharashtra Vidhan Parishad Elections 2022: महाराष्ट्र विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान पार पडलं. विधासभेच्या २८५ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करण्याचा हक्क बजावता आला नाही. विविध प्रकरणांमध्ये तुरूंगात असल्याने सुप्रीम कोर्टाने त्यांना मतदान करण्यास नकार दिला. पण उर्वरित २८५ आमदारांनी सायंकाळी चार वाजेपर्यंत आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काँग्रेसकडूनभाजपाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या मतदानावर आक्षेप घेण्यात आला. तशी तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली.
नक्की काय आहे आक्षेप?
विधान परिषदेची मतदान प्रक्रिया ही गुप्त मतदान पद्धतीची असते. अशा प्रक्रियेमध्ये आपण मतदान केल्यानंतर ती मतपत्रिका स्वत: फोल्ड करून मतपेटीत स्वत:च्या हाताने टाकायची असते. पण हे दोनही आमदार कर्करोगाशी झुंज देत असल्यामुळे त्यांना मतदानासाठी व्हीलचेअर वरून आणण्यात आले होते. अशा परिस्थितीत त्यांनी मतदान करून झाल्यावर ही मतपत्रिका थेट मतपेटीत टाकणे शक्य नसल्याने सहकाऱ्यांना दिली आणि त्यांनी ती मतपत्रिका मतपेटीत टाकली. त्यामुळे अशा प्रकारे दुसऱ्याला मतपत्रिका देण्याबाबत भाजपाने आधीच निवडणूक आयोगाकडून परवानही घेतली होती का? तसे नसेल तर या नियमाचा भंग होतो अशा आशयाचा आक्षेप काँग्रेसकडून घेण्यात आला आहे.