- यदु जोशीमुंबई : राज्यातील भाजपच्या ३० टक्के आमदारांची कामगिरी असमाधानकारक असल्याचे रिपोर्ट कार्ड काही महिन्यांपूर्वी त्यांच्या हातात देण्यात आले होते. असे असले तरी प्रत्यक्षात १० ते १२ विद्यमान आमदारांचे तिकिट कापले जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.२०१४ मध्ये भाजपचे १२२ आमदार निवडून आले होते. त्यातील अनिल गोटे आणि आशिष देशमुख यांनी आधीच आमदारकीचा आणि भाजपचा राजीनामा दिला आहे. आमदार असलेले गिरीष बापट, उन्मेष पाटील हे खासदार झाले. त्यामुळे आता भाजपचे ११८ आमदार आहेत. यापैकी १० ते १२ आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता असल्याचे पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. याचा अर्थ १०८ आमदारांना पुन्हा संधी दिली जाईल. हा आकडा कोणत्याही परिस्थितीत १०० च्या खाली असणार नाही, असेही सांगण्यात आले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा महिन्यांपूर्वी आमदारांच्या हातात रिपोर्ट कार्ड दिले होते. मुख्यमंत्र्यांनी आपल्या तसेच पक्षसंघटनेच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे ते रिपोर्ट कार्ड तयार केले होते. आमदारांची कामगिरी, राज्य व केंद्र सरकारच्या योजनांची त्यांच्या मतदारसंघात कितपत प्रभावी अंमलबजावणी झाली आहे, लोकांची नाराजी कोणत्या मुद्यांवर आहे, लोकांची पसंती कोणत्या मुद्यांवर आहे असे सगळे त्या रिपोर्ट कार्डमध्ये होते. या शिवाय, कोणत्या स्पर्धकांकडून आमदारांना मोठे आव्हान भविष्यात मिळू शकते याचाही उल्लेख होता.मुख्यमंत्र्यांनीच रिपोर्ट कार्ड हाती दिल्याने ज्यांची कामगिरी असमाधानकारक होती त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली होती. भाजप किमान २५ ते ३० विद्यमान आमदारांना घरी बसविणार अशा बातम्याही आल्या होत्या. मात्र, आता हा आकडा कमीतकमी असेल, असे समजते. कामगिरीसोबत इतरही निकष लावण्यात आल्याने काही जण बचावणार आहेत. त्यात जातीय समीकरणे, भाजप-शिवसेनेची युती होणे, रा. स्व. संघाच्या यंत्रणेकडून मिळालेला ‘फीडबँक’, सहा महिन्यांत आमदारांनी कामगिरीत केलेली कमालीची सुधारणा, संभाव्य विरोधी उमेदवारांमध्ये झालेले बदल अशा सगळ््या मुद्यांचा विचारही करण्यात आला.लोकसभा निवडणुकीत सेनेला फटकालोकसभा निवडणुकीत शिवसेनेने जुन्याच चेहऱ्यांना पसंती दिली. त्याचा फटकाही शिवसेनेला बसला आणि आनंदराव अडसूळ, चंद्रकांत खैरे, शिवाजीराव अढळराव पाटील यांच्यासारखे दिग्गज पराभूत झाले होते. भाजपने विद्यमान खासदारांपैकी काहींना घरी पाठविण्याचे धाडस दाखविले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत भाजपकडून फारसे आमदार घरी पाठविले जाणार नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिली.
Vidhan Sabha 2019: ३० टक्के आमदारांची कामगिरी खराब, तरी १० आमदारांचंच तिकीट कापणार
By यदू जोशी | Published: September 23, 2019 4:10 AM