- पोपट पवार कोल्हापूर : महाराष्ट्र विधानसभेतील एक-दोन नव्हे, तर तब्बल ६८ विद्यमान आमदार विधानसभेच्या निवडणुकीत हॅट्ट्रिक करण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे या आमदारांची हॅट्ट्रिक विरोधक रोखणार की, सलग तीन वेळा निवडून येण्याचा विक्रम संबंधित आमदार आपल्या नावावर करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. विशेष म्हणजे या आमदारांमध्ये काही मंत्र्यांचाही समावेश असल्याने त्यांच्या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.महाराष्ट्राच्या विधानसभेत २८८ आमदार असून, यापैकी ६८ आमदार सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. यातील तीन-चार आमदार सोडले, तर बहुतांश आमदारांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यामुळे या आमदारांनी हॅट्ट्रिक करण्यासाठी कंबर कसली आहे. विशेष म्हणजे या हॅट्ट्रिकसाठी तयारी करणाºया आमदारांमध्ये भाजपचे सर्वाधिक २४ आमदार आहेत, तर शिवसेनेचे १६, काँग्रेसचे १२, राष्ट्रवादीचे पाच, बहुजन विकास आघाडी, भारिप, अपक्ष, व शेकाप अशा प्रत्येकी एका आमदाराचा समावेश आहे. विशेष म्हणजे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीला रामराम करीत भाजप-शिवसेनेचा झेंडा हाती घेतलेले सहा आमदारही हॅट्ट्रिकसाठी निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहेत.ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा विजयश्री खेचून आणली आहे. गत निवडणुकीत परळीच्या रणांगणात भाऊबंदकीचा सामना चांगलाच रंगला होता. त्यात पंकजा यांनी बंधू धनंजय मुंडे यांचा पराभव करीत परळीवरचे वर्चस्व राखले होते. यंदा मात्र, पंकजा यांची हॅट्ट्रिक रोखण्यासाठी राष्ट्रवादीने धनंजय मुंडे यांना मोठी रसद पुरविल्याने हा सामना चांगलाच रंगणार आहे. तिकडे विलासरावांच्या माघारी बाभूळगावची गढी काहीशी ढासळली असली तरी विधानसभेला अमित देशमुख यांनी सलग दोन वेळा लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून बाजी मारत काँग्रेसचे अस्तित्व टिकवून ठेवले आहे. यंदा मात्र, अमित देशमुख यांची हॅट्ट्रिक रोखण्यासाठी भाजपने देशमुखांचे पारंपरिक विरोधक शिवाजीराव पाटील-कव्हेकर यांचे पुत्र अजित यांनाच मैदानात उतरविण्याची खेळी सुरूकेली आहे. त्यामुळे अमित देशमुख हॅट्ट्रिक करणार की, भाजप बाभूळगावच्या गढीवरील काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात आणणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. एरव्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सतत मैदानात उतरून राष्ट्रवादीची बाजू सावरणारे कळवा-मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनाही यंदा आपले अस्तित्व पणाला लावावे लागणार आहे. युती झाली तर ऐनवेळी भाजपकडून गणेश नाईक यांनाच आव्हाडांची हॅट्ट्रिक रोखण्यासाठी आव्हाडांच्या होमपिचवर धाडले जाण्याची शक्यता आहे. कर्जत-जामखेडचे रणांगण रोहित पवारांच्या एन्ट्रीमुळे चांगलेच चर्चेत आले असून, विद्यमान मंत्री राम शिंदे यांची हॅट्ट्रिक रोखण्यासाठी अख्खी राष्ट्रवादी कामाला लागली आहे. भाजपनेही राम शिंदे यांच्या मागे मोठी रसद पुरविल्याचे चित्र आहे. शिवसेना नेते व राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीच्या पट्ट्यात ‘पुरंदर’मधून सलग दोन वेळा विजय मिळविला आहे. लोकसभेवेळी त्यांनी थेट पवार परिवाराला अंगावर घेतल्याने अजित पवार यांनी शिवतारेंची हॅट्ट्रिक रोखण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. त्यामुळे पुरंदरच्या ऐतिहासिक मैदानात शिवसेना बारामतीकरांना पुन्हा पाणी पाजणार की, अजित पवार आपला शब्द खरा करणार, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.या बड्या नेत्यांची हॅट्ट्रिकसाठी धडपडपंकजा मुंडे (भाजप), जयकुमार रावल (भाजप), अनिल बोंडे (भाजप), पंकज भुजबळ (राष्ट्रवादी), राजकुमार बडोले (भाजप), विजय शिवतारे (शिवसेना), बाळा भेगडे (भाजप), रवींद्र वायकर (शिवसेना) , राम कदम (भाजप), क्षितिज ठाकूर (बविआ), जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी), राम शिंंदे (भाजप), अमित देशमुख (काँग्रेस), चंद्रदीप नरके (शिवसेना), राजेश क्षीरसागर (शिवसेना), सुजित मिणचेकर (शिवसेना), सुरेश हाळवणकर (भाजप).पक्षांतर केलेल्या सहा आमदारांनाही हॅट्ट्रिकचे वेधअब्दुल सत्तार( शिवसेना), भाऊसाहेब कांबळे (शिवसेना), विलास तरे (शिवसेना), जयकुमार गोरे (भाजप), संदीप नाईक (भाजप), निर्मला गावित (शिवसेना).भाजप- २४, शिवसेना- १६, काँग्रेस- १२, राष्ट्रवादी- ५, बविआ-१, भारिप-१, अपक्ष- १, शेकाप- १, पक्षांतर केलेले- ६.
Vidhan Sabha 2019: ६८ आमदार हॅट्ट्रिकसाठी उतरणार मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 3:39 AM