पुणे : सलग ५ वेळा विजय मिळवलेल्या माजी मंत्री गिरीश बापट यांची खासदारपदी निवड झाल्यामुळे रिकामा झालेल्या कसबा विधानसभा मतदारसंघावर आता सर्वच पक्षांचा डोळा आहे. भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघात सर्वाधिक इच्छुक भाजपचेच असले तरीही शिवसेनेने या मतदारसंघावर हक्क सांगितला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसनेही आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ मागितला आहे. शहराच्या मध्यभागातील पेठा हे या मतदारसंघाचे वैशिष्ट्य आहे. आता लोकमान्य नगर, राजेंद्रनगर, तसेच पर्वती पायथ्याचा काही भागही जोडला गेला आहे. तरीही शहरातील अन्य मतदारसंघांच्या तुलनेत कसबा म्हणजे उमेदवारांसाठी पर्वणीच आहे. क्षेत्रफळाने कमी, मतदारसंख्येने कमी (फक्त २ लाख ९० हजार मतदार), प्रचारासाठी तुलनेने करावा लागणारा खर्च कमी, पेठांचा परिसर असल्याने परिचयाचे मतदार जास्त असा फायदाच फायदा या मतदारसंघात आहेत. त्यामुळेच की काय युतीतील शिवसेना व आघाडीतील काँग्रेस या मतदारसंघावर दावा सांगत आहेत.शिवसैनिकांना कोणत्याही स्थितीत हा मतदारसंघ हवाच आहे. १९७८ नंतर अगदीच अपवाद म्हणून उल्हास काळोखे आणि वसंत थोरात यांनीच फक्त हा मतदारसंघ काँग्रेसला मिळवून दिला. उर्वरित प्रत्येक वेळी अरविंद लेले, अण्णा जोशी व सलग ५ वेळा बापट यांनी कसब्यावर भाजपचेच शिक्कामोर्तब केले आहे.काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, लोकसभेचे उमेदवार मोहन जोशी हे मतदार संघ मागत आहेत.>भाजपचे दावेदारमहापौर मुक्ता टिळक प्रमुख दावेदार आहेत. त्यानंतर हेमंत रासने, धीरज घाटे, गणेश बीडकर, महेश लडकत या नगरसेवकांनी तर अशोक येनपुरे, दिलीप काळोखे या माजी नगरसेवकांनी उमेदवारी मागितली आहे. बापट यांच्या स्नुषा स्वरदा यांचेही नाव चर्चेत आहे. त्या सांगलीच्या माजी नगरसेवक असून विवाहानंतर पुण्याच्या राजकारणात सक्रिय आहेत.
Vidhan Sabha 2019 : पुण्यातील ‘कसबा’वर युतीतील सर्वांचाच डोळा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 4:23 AM