मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोग मंगळवार (दि.१७)पासून दोन दिवस मुंबईत निवडणूक कामाचा आढावा घेणार असल्यामुळे विधानसभा निवडणूक आचारसंहितेची घोषणा १९ तारखेनंतर होण्याची शक्यता आहे.निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये निवडणुकीची कामे सुरू असून, या कामांचा आढावा घेतल्यानंतरच निवडणुकीची तारीख जाहीर होणार आहे. यासाठी मंगळवारपासून मुंबईत आयोगाकडून जिल्हानिहाय निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेतला जाणार आहे. सर्व तीन निवडणूक आयुक्त, वरिष्ठ उपायुक्त, तसेच अधिकारी निवडणूक कामांचा आढावा घेणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीत पोलीस नोडल अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी, पोलीस अधीक्षक, विभागीय आयुक्त, मुख्य सचिव, तसेच राज्यातील बड्या अधिकाऱ्यांशी चर्चा होणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेची सांगता १९ सप्टेंबर रोजी होणार असून, या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमानंतरच निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
Vidhan Sabha 2019 : १९ तारखेनंतर विधानसभा निवडणूक आचारसंहिता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 6:28 AM