मुंबई : अन्य कोणत्याही यंत्राप्रमाणे ईव्हीएममध्येसुद्धा तांत्रिक बिघाड होण्याची शक्यता नाकारत येत नाही. मात्र, ईव्हीएम हॅक करणे किंवा त्यात छेडछडा करणे अशक्य आहे. मतपत्रिकेवरील मतदान हा इतिहास झाला असून विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएमद्वारेच मतदान घेण्यात येणार असल्याचे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी मंगळवारी स्पष्ट केले.विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली आयोगाचे पथक सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने आयोगाने आज दिवसभर सह्याद्री अतिथीगृहात विविध राजकीय पक्ष, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांसह निवडणुकीशी संबंधित विविध यंत्रणांच्या अधिकारी, प्रतिनिधींशी चर्चा केली. दिवसभर चाललेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत सुनिल अरोरा म्हणाले की, काही राजकीय पक्षांनी ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी केली आहे. मात्र, मतपत्रिका आता इतिहासजमा झाल्या आहेत. मतदान ईव्हीएमद्वारेच होणार असल्याचे आयोगाने संबंधित राजकीय पक्षांना सांगितले आहे. ईव्हीएममध्ये किरकोळ तांत्रिक बिघाड येऊ शकतो. पण अशा तांत्रिक बिघाडांचे प्रमाण अगदीच नगण्य असून तातडीने पर्यायी व्यवस्थाही केली जाते. शिवाय, सर्वोच्च न्यायालयाच्या निदेर्शानुसार व्हीव्हीपॅटचाही वापर करण्यात येत असल्याचे अरोरा यांनी स्पष्ट केले.याशिवाय, पहिल्या किंवा त्यावरील मजल्यावरील मतदान केंद्रे तळमजल्यावर असावीत, अशी आग्रही मागणी राजकीय पक्षांनी बैठकीत केली. महाराष्ट्रात सुमारे ५३०० मतदान केंद्रे तळमजल्यावरच आहेत. जी काही थोडीफार वरच्या मजल्यावर आहेत तिथे लिफ्टची सुविधा असल्याचे राज्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने आम्हाला सांगितले आहे. तरीही अशा ठिकाणी लिफ्ट सुस्थितीत ठेवत तसे प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त अरोरा यांनी स्पष्ट केले.यावेळी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विशेष टपाल तिकीट आणि पाकिटाचे अनावरण करण्यात आले. कॉफी टेबल पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले. यावेळी राज्याचे सह मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे लिखित 'निवडणूक प्रक्रियेचे नियम व कायदे' या मराठी पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.>दिवाळीपूर्वीच निवडणूकमहाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा नेहमीप्रमाणे राजधानी दिल्लीतील पत्रकार परिषदेत करण्यात येईल. विधानसभेच्या तारखा निश्चित करताना दिवाळीसह विविध धार्मिक उत्सव, शाळा महाविद्यालियांच्या परीक्षा, सुट्टयांचाही विचार करण्यात येतो. याशिवाय केंद्रीय दलांची उपलब्धता या बाबी महत्वाच्या असून त्या अनुषंगाने तारखा निश्चय करण्यात येणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी स्पष्ट केले.मदतकार्य सुरूच राहणारसांगली, कोल्हापूर आणि सातारासह विविध पूरग्रस्त भागातील बचावकार्य, मदतकार्य यापुढेही सुरूच राहील, असे आयोगाने स्पष्ट केले. याशिवाय आचारसंहितेच्या काळात अचानक एखादी गरज निर्माण झाल्यास राज्याने त्या अनुषंगाने विशेष प्रस्ताव सादर करावा निवडणूक आयोग सहानुभूतीने विचार करेल, असे अरोरा यांनी स्पष्ट केले.
Vidhan Sabha 2019 : मतपत्रिका इतिहासजमा; ईव्हीएमद्वारेच मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 4:43 AM